जळगाव : मुंबईत आत्महत्या केलेल्या डॉ.पायल सलीम तडवी (३०, रा.साई संस्कार कॉलनी, वाघ नगर, जळगाव) या महिला डॉक्टरची रॅगिंग करणा-या सहकारी तीन महिला विद्यार्थिनी डॉक्टरांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता पायलचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. मुंबई येथील नायर रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसºया वर्षात (एम.डी)शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल सलीम तडवी यांना सिनियर असलेल्या सहकारी डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती महिरे व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास व अपमानित केले जात होते. अधीष्ठाता व व्याख्याता यांच्याकडे तक्रार करुनही त्याची दखल न घेतल्याने डॉ.पायल यांनी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता वसतीगृहातच गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी गुरुवारी रॅगिंग करणाºया तिन्ही महिला डॉक्टरांविरुध्द या आग्रीपाडा (भायखळा) पोलीस ठाण्यात रॅगिंग, आत्महत्येस प्रवत्त करणे व अट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. प्रवेशद्वारावरच रोखल मृतदेह डॉ.पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाºया डॉ.हेमा आहुजा, डॉ.भक्ती महिरे व डॉ.अंकिता खंडेलवाल या तिघांना तत्काळ अटक करावी, भविष्यात कोणत्याही विद्यार्थिनीची रॅगिंग होऊ नये यासाठी आदीवासी तडवी भिल युवा कृती समिती व नातेवाईकांनी शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता डॉ.पायल यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर आणला. दोनशेच्यावर लोकांचा जमाव व रस्त्यावरच मृतदेह असलेली शवपेटी ठेवल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.यावेळी दोन्हीकडील वाहतूक बंद झाली होती. मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्याची तयारी करीत असतानाच पोलिसांनी प्रवेशद्वार बंद करुन बाहेरच मृतदेह रोखला. यावेळी डॉ.पायल यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांना फाशीची शिक्षा द्यावी, त्यांना आताच अटक करावी अशा घोषणा दिल्या. डॉ.पायलच्या आईचा आक्रोश जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह आणल्यानंतर डॉ.पायल यांच्या आई अबेदा तडवी यांनी टाहो फोडत प्रचंड आक्रोश केला. माझ्या मुलीचा माझ्या डोळ्यासमोर छळ झाला. अधीष्ठाता व व्याख्याता यांनी लक्ष दिले नाही, त्यांना मुली नाहीत का?, माझी एकुलती मुलगी होती?, तिला डॉक्टर व्हायचे होते असा आक्रोश त्या करीत होत्या. त्यांची ही स्थिती पाहता उपस्थित महिलांच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते.
मुंबईत रॅगिंग करणाऱ्या तिन्ही महिला डॉक्टरांच्या अटकेसाठी मृतदेह आणला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:30 PM