भुसावळ : तालुक्यातील कंडारी येथील महिलेकडून घरकुलाच्या कामाच्या अनुदानाचा तिसरा टप्पा मिळवून देण्यासाठी एक हजाराची लाच घेताना येथील पंचायत समिती कार्यालयातील महिला अभियंता भाग्यश्री शिंदे यांना अटक करण्यत आली. ही घटना जागतिक महिलादिनी ८ रोजी दुपारी ३.३० वाजेदरम्यान पंचायत समिती कार्यालयात घडली. पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील कंडारी येथील रहिवासी तक्रारदार वीट कामगार महिलेच्या पतीच्या नावाने इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकूल मंजूर झाले असून, अनुदानाच्या रकमेचे तीनपैकी दोन टप्पे प्राप्त झाले आहेत. अनुदानाचा मंजूर तिसरा टप्पा घेण्यासाठी तक्रारदार येथील पंचायत समिती कार्यालयात आल्या असता, गृहनिर्माण विभागाच्या अभियंता भाग्यश्री शिंदे यांनी त्यांच्याकडे दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती एक हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.तक्रारदार महिलेने जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात याबाबत तक्रार दिली. त्यानुसार सर्वत्र महिला दिनाचा उत्साह साजरा होत असताना दुसरीकडे येथील पंचायत समिती कार्यालयात दुपारी ३.३० वाजता भाग्यश्री शिंदे यांना एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटनेमुळे महिला दिनाच्या नंतर झालेल्या विविध कार्यक्रमांवर विरजण पडले.याबाबत शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक पराग सोनवणे व सहकारी करीत आहेत.विशेष म्हणजे तक्रारदार महिला ही वीटभट्टीवर रोजंदारीने काम करते. अशिक्षित असूनही तिने लाचखोरीविरुद्ध पदर खोचला आणि महिलादिनी लाचखाऊ अधिकारी महिलेचा बुरखा फाडला. मजुरी करणाºया अशिक्षित महिलेने सुशिक्षित महिलेस अशा पद्धतीने उघडे पाडले. याबद्दल या अशिक्षित महिलेचे सोशल मीडियावरून दिवसभर तेवढेच कौतुकही करण्यात येत होते.
एक हजाराची लाच घेताना महिला अभियंता अटकेत
By admin | Published: March 09, 2017 12:27 AM