लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आशादीप वसतिगृह प्रकरणातील जबाब जिल्हाधिकारी यांच्या समक्ष देण्यास सांगितले होते. मात्र, सांगितल्याप्रमाणे जबाब का दिला नाही, म्हणत साहिल आयुब पठाण (२२, रा. समता नगर) याने विवाहित महिलेला मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला ही कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी तिची मुलगी हरविली होती. याप्रकरणी महिलेने पोलिसात हरविल्याची नोंद केली होती. बेपत्ता झालेली मुलगी पोलिसांना मिळून आल्याने पोलिसांनी तिला आशादीप वसतिगृहात ठेवले होते. नंतर मुलीली तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले होते. या काळातच १ मार्च रोजी वसतिगृह येथे मुलींना नाचविण्याची तक्रार झाली हाेती. याप्रकरणी महिलेचा जिल्हाधिकारी यांच्याकडे जबाब नोंदविण्यात आला होता. नंतर ही महिला शेगाव येथे निघून गेली होती.
मारहाणीनंतर केला विनयभंग
शेगाव येथून गुरूवारी सायंकाळी ६ वाजता महिला घरी परतली. सायंकाळी ७ वाजता साहिल आयुब पठाण हा महिलेचा घरी आला. जिल्हाधिकारी यांच्यासमोर मी सांगितल्याप्रमाणे जबाब का दिला नाही, असे म्हणत महिलेल शिवीगाळ केली व मारहाण करीत विनयभंग केला.
जीवे ठार मारण्याची धमकी
पीडित महिलेने साहिल याच्या तावडीतून सुटून घरातून पळ काढला. दरम्यान साहिल हा तिच्या मागे पळत जावून त्या महिलेला मारहाण करीत तिला जीवेठार करण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.