पॉझिटिव्ह स्टोरी
पारोळा : तालुक्यातील टिटवी तांडा येथील रहिवासी कलाबाई दिनकर जाधव यांना कोरोनाची लागण झाली. दोन- तीन दिवस घरीच उपचार केला; पण त्या उपचारादरम्यान त्यांची तब्येत खूप बिघडल्याने त्यांचा मुलगा कृष्णा जाधव याने नगरसेवक पी.जी. पाटील यांची मदत घेत त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तपासण्या केल्या असता ऑक्सिजन पातळी ६० ते ६२ व एचआरसीटीचा स्कोअर २४ होता. तरीही या महिलेला धीर देत तिचे मनोधैर्य वाढवीत तिला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत पूर्णपणे बरे करीत तिला घरी पाठविले.
या महिलेची प्रकृती खूप खालावल्याने तिला तत्काळ ऑक्सिजन बेड देऊन तिच्यावर उपचार सुरू केले. या महिलेची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. खाजगीमध्ये उपचार घेणे शक्य नव्हते. पी.जी. पाटील हे त्या सर्व कुटुंबाला धीर देत येथेच आई बरी होईल घाबरू नको, असे मुलाला सांगत. या महिलेला ऑक्सिजन देऊन तिच्यावर उपचार सुरू झाले. डॉ. श्रीनाथ चौधरी, डॉ. जागृती पाटील, डॉ. प्रियंका बडगुजर, सिस्टर सुनीता मोरे, कोमल बिऱ्हाडे, मंगला पाटील, वाॅर्डबॉय प्रेम वानखडे, रमेश वानखडे, रामकृष्ण पाटील, भूषण पाटील, दीपक पाटील, प्रसाद राजहंस, दीपक सोनार, सामाजिक कार्यकर्ते दिनेश लोहार या सर्वांनी त्या परिवाराला धीर दिला व आपापल्या परीने सर्वांनी आपल्या परिवारातील सदस्य समजून सर्वांनी १३ दिवस मदत केली. त्या महिलेला धीर दिला व १३ दिवसांनी ही महिला या कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बरी होऊन घरी गेली. या कुटुंबातील सर्वांनी वरील मदत करणाऱ्यांचे आभार मानले. टिटवी तांडा या गावी कोरोनावर मात करीत त्या घरी पोहोचल्या.
गावात दिनकर वासराम जाधव, कलाबाई जाधव व कृष्णा जाधव परिवाराने महिलेचे स्वागत केले. नगरसेवक पी.जी. पाटील यांच्यामुळे आईचा जीव वाचला, असे मुलगा कृष्णा याने शेवटी बोलून दाखविले.