लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर: गच्चीवर उन्हात डाळ वाळत घालण्यासाठी जाण्याचे विचारण्यास घरी गेलेल्या २७ वर्षीय विवाहीतेस घरात कोंबून २६ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अत्याचार करणारा फरार आरोपी अरूण सुभाष प्रजापती रा .केर्हाळे बु।।, यास रावेर पोलिसांनी आज अटक केली. त्यास रावेर न्यायालयासमोर हजर केले असता न्या. आर. एल. राठोड यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रावेर पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, केर्हाळे बु ।।येथील अरूण सुभाष प्रजापती याच्या घराजवळ असलेल्या एका २७ वर्षीय विवाहीतेने त्याच्या राहत्या घराच्या गच्चीवर (छतावर) दुपारी उन्हात दाळ वाळत घालण्याबाबत विचारण्यासाठी गेली असता, आरोपी अरूण सुभाष प्रजापती याने तो घरी एकटाच असल्याची संधी साधून खिडक्या व दरवाजे बंद करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यासंदर्भात कुणालाही काही सांगितल्यास तिच्या पतीला जिवे ठार मारून टाकीन अशी धमकी दिली होती.
ही घटना २६ मार्च रोजी घडली होती. सदर पिडीत विवाहीतेने तिच्या पतीला ही हकीगत सांगितल्याने ३१ मार्च रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.