आॅनलाईन लोकमतजळगाव दि, २ : नवीन बसस्थानकात बसची प्रतिक्षा करीत असलेल्या महिलेची नजर चुकवून बॅगेतून साडे तीन हजार रुपये लांबविण्यात आले. पैसे गेल्याने हताश होऊन बसलेल्या असतानाच हा चोरटा दोन तासांनी पुन्हा नवीन सावज शोधायला आला असता तो या महिलेच्या नजरेस पडला. त्या महिलेने मोठ्या धाडसाने त्याला पकडून कानाखाली आवाज काढला नंतर लोकांच्या मदतीने पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुलोचना गणेश पारधी (रा.मुंबई, मुळ रा.पाळधी) या सोमवारी मुंबई जाण्यासाठी जामनेर बसने जळगावात आल्या होत्या. मुंबई बसला वेळ असल्याने १०.३० वाजता बसची प्रतिक्षा करीत असताना प्रफुल्ल वसंतराव देशमुख (वय ३२ रा.अकोला, ह.मु.जामनेर) हा त्यांच्याशेजारी येऊन बसला. सुलोचना यांनी डोळे लावल्याचे पाहून त्याने त्यांच्या बॅगेतील साडे तीन हजार रुपये काढले व क्षणातच तेथून गायब झाला. देशमुख या सुलोचना यांच्यासोबत असल्याच्या संशयामुळे त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. थोड्या वेळाने सुलोचना बॅगेची चैन उघडी दिसली.त्यांनी पैसै तपासले असता गायब झाले होते.
अन् दोन तासांनी आला चोरटापैसे चोरी झाल्याने सुलोचना पारधी या हताश झाल्या होत्या. एस.टी.चे कर्मचारी व सह प्रवाशी त्यांना धीर देत होते. दोन तास त्या जागेवरच बसून होता. ज्या महिलेचे पैसे चोरले ती महिला आता गेली असेल या हेतूने नवीन सावज शोधासाठी तो मद्याच्या नशेत बसस्थानकात आला. त्याला पाहताच या महिलेने धाव घेऊन पकडले. चोरटा असल्याचे समजल्यानंतर सह प्रवाशांनीही त्यांची मदत केली. हा गोंधळ सुरु असताना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी अल्ताफ पठाण यांनी चोरट्याला लोकांच्या तावडीतून सोडून पोलीस ठाण्यात नेले.तेथे चौकशी केली असता त्याने कबुली देत महिलेचे पैसे परत केले. महिलेने फिर्यान दिल्याने चोरट्याविरुध्द १०९ प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. देशमुख हा जामनेर येथे एका हॉटेलमध्ये कूक असल्याचे सांगण्यात आले. बसस्थानकात सातत्याने चोºया होत असतानाही पोलिसांचा कानाडोळा होत असल्याचा आरोप गोपाळ पाटील यांनी केला.