लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- गर्भाशयातील गाठीमुळे जीव धोक्यात आलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेला जीवदान देण्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. या महिलेला अनेक खासगी रुग्णालयांनी उपचार नाकारल्यानंतर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
महिलेच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागामध्ये २० सप्टेंबर रोजी महिलेला दाखल केले. यावेळी विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली. पोटात गर्भाशयाला मोठी गाठ होती. सर्व तपासण्या व सोनोग्राफी केल्यानंतर असे आढळून आले की, गर्भाशय मधील गाठ अडीच किलोची आहे. महिलेवर तातडीने २१ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करून ही अडीच किलोची गाठ काढण्यात आली. शनिवारी महिलेची प्रकृती स्थिर असून तिचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. शितल ताटे, डॉ. कोमल तुपसागर, डॉ. चंदन महाजन, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. राजश्री येसगे, डॉ. विनेश पावरा, यांच्यासह भूलतज्ञ डॉ. संदिप पटेल, डॉ. काजल साळुंके, डॉ. स्वप्नील इंकणे, परिचारिका नीला जोशी, परिचारिका कीर्ती तळेले यांनी सहकार्य केले.