जळगाव : पुढे चालणाऱ्या महिलेला मागून आलेल्या डंपरने धडक दिल्याने लिलाबाई रतिलाल बारी (५५, चौधरीवाडा) या महिलेचे दोन दात पडले तर पायाला जखम झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता जुन्या जळगावमधील आंबेडकर नगरात घडली.याचवेळी डंपरच्या धडकेत दुचाकीचाही चुराडा झाला. गल्लीबोळातून नेहमीच अवजड वाहनांचा वापर होत असल्याने त्याला बंदी म्हणून रहिवाशांनी संतप्त होऊन डंपर अडविले. यावेळी वातावरण तापले होते. माजी नगरसेवक व पोलिसांनी हस्तक्षेप करुन हा वाद मिटविला. जखमीला रुग्णालयात तर डंपर पोलीस ठाण्यात नेण्यात आला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मंदीर, आंबेडकर नगर व का.ऊ.कोल्हे शाळा या मारगार्वर नेहमीच वाळू तसेच इतर अवजड वाहनांचा वापर होता. ही गल्ली अतिशय बारीक असून रस्त्यावर लहान मुले,वृध्द तसेच महिलांची मोठी गदर्प असते. त्यामुळे नेहमीच किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. शनिवारी का.ऊ.कोल्हे शाळेकडून येणाऱ्या डंपरने (क्र.जी.जे.२१ टी.६९१६) रत्याने चालत असलेल्या लिलाबाई बारी यांना धडक दिली, त्यात त्यांचे दोन दात पडले तर पायाला रक्तस्त्राव सुरु झाला. यामुळे रहिवाशी संतप्त झाले.
माजी नगरसेविका खुशबु बनसोडे व माजी नगरसेवक कमलाकर बनसोडे यांनी तातडीने जखमी महिलेला खासगी दवाखान्यात दाखल केले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. वातावरण तापलेले असल्याने पोलीस व बनसोडे यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. डंपरला चालकासह ताब्यात घेण्यात आले आहे.
नितीन साहेबराव पाटील (रा.काशिनाथ नगर, जुना असोदा रोड) असे चालकाचे नाव असून मालक प्रवीण कडू चौधरी (रा.कांचन नगर)असल्याची माहिती पोलिसांनी दिली.