भुसावळ : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार रॅलीस शनिवारी सकाळी ९ वाजता खडका रोडलगतच्या पाटील मळा भागातील महिलांनी पाणी प्रश्नावर घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली.पाटील मळ्यातून प्रचार रॅलीला सुरुवात झाली. प्रचार सुरू असताना पाटील मळा भागातील जनाधारच्या नगरसेविका नीलिमा सचिन पाटील यांनी तेथील शंभर-दिडशे रहिवाशी व महिलांसह भाजपाच्या प्रचार रॅलीला घेराव घातला. पाटील मळ्यात गेल्या २२ दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही व अजून आठ दिवस पाणी येणार नाही, पाण्याची टंचाई, व्यवस्थित पाणी मिळत नाही अशा विविध समस्या त्यांनी व रहिवाशांनी माडल्या. पाणी समस्या दूर करा तरच मते मागा, अशा भाषेत नीलिमा पाटील यांनी ठणकावले.रॅलीत माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, निर्मल कोठारी, राजेंद्र नाटकर, पुरुषोत्तम नारखेडे, दीपक धांडे, मुकेश गुंजाळ यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते होते.नेमाडे व महिलांमध्ये बाचाबाचीपाटील मळयातील रहिवाशांनी रॅलीतील नगरसेवकांना जाब विचारला असता प्रमोद नेमाडे हे महिलांशी उद्घट भाषेत बोलले व तेथे वाद सुरू झाला.शेवटी नगरसेवक निर्मल कोठारी यांनी पाटील मळा भागातीत विहिरीतील गाळ काढून रहिवाशांना पाण्याची व्यवस्था करुन देण्याचे आश्वासन दिले. तेव्हा तेथील रहिवाशी महिला शांत झाल्या. पिण्याच्या पाण्यासाठी अशाप्रकारे प्रचार रॅलीला घेराव टाकण्याचा हा या निवडणुकीतील आणि भुसावळ शहरातील पहिलाच प्रकार आहे.दरम्यान, प्रमोद नेमाडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘पाटील मळ्यात पाणी मिळत नाही. महिलांशी उद्धटपणे बोललो नाही. असे बोलण्याचा काहीच संबंध येत नाही.’
पाण्यासाठी महिला संतप्त, भाजपच्या प्रचार रॅलीला घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:43 PM