किवळे - किवळे-सांगवी बीआरटी मार्गावरिल रावेत ते किवळे दरम्यान बीआरटी लेनमधून वारंवार खाजगी वाहने ये-जा करीत असून त्यामुळे छेद रस्त्याच्या ठिकाणी अपघात होत आहेत. बीआरटी मार्गाकडूनकडून रावेत येथील सर्वात मोठया 'सेलेस्टियल सिटी सोसायटी 'या गृहप्रकल्पाकडे ये-जा करणे खुपच धोकादायक ठरत असल्याने संबंधितांना लेखी निवेदने देऊनही कार्यवाही होत नसल्याने रस्ता ओलांडणे असुरक्षित बनले असून येथील महिलांनी प्राजक्ता रूद्रवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास रावेत येथील सेलेस्टियल सिटी सोसायटीजवळच्या चौकात बीआरटी लेनमधून ये- जा करणाऱ्या वाहनांना दोरी आडवी धरून सर्वांनी उभे राहून अटकाव करीत आहेत .
महिलांनी रास्ता रोको केल्याचे पाहून दररोज बीआरटी लेनमधून जाणारे दुचाकी व मोटार चालक आपली वाहने पुन्हा मागे नेतानाचे चित्र दिसून आले . मात्र काही वाहनचालक संबंधित महिलांना वाहनांना रस्ता देण्याची विनंती करीत होते. महिलांनी अशा वाहनचालकांना बीआरटीमधून ये जा करू नका असे सांगितले. स्थानिक नगरसेविका संगिता भोंडवे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे यांनीही काही वेळ थांबून आंदोलनाला पांठीबा दिला.
विशेष म्हणजे रास्ता रोको आंदोलन सुरू असताना या चौकातील नेमणूकीवर असणारा सुरक्षारक्षक गायब असल्याचे दिसून आले. रास्ता रोकोसाठी प्राजक्ता रुद्रवार यांनी पुढाकार घेतला. केतकी नायडु,सुस्वागता राँय चौधरी,अनिता कुमार,रचना गुप्ता,प्रेम गुप्ता,मोनल महादेविया,रोशनी सिंग,शितल बुरान,नाझ कैझ,सुरेखा लाहोट,विशाखा कुलकर्णी,रोशित रविंद्रन,निलेश वाणी,दिपरंजन मोहंती,रश्मी गुप्ता,रिंकु बनाफल,पुनम अगरवाल, व्रुष्टी वाले आदी महिलांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.