जळगाव : इंद्रप्रस्थ नगर, जनाई नगर, शिवशंकर कॉलनी, राधाकृष्ण नगर, दत्तात्रय नगरसह त्रिभुवन कॉलनी या परिसरात सुरु करण्यात येणाऱ्या बिअर बारला विरोध दर्शविला असून याला परवानगी न देण्याच्या मागणीसाठी या परिसरातील महिला थेट जिल्हाधिकारी कार्यालयात धडकल्या. या संदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले असून या व्यवसायास परवानगी न देण्याची मागणी केली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात दोन वर्षांपूर्वी राजाराम हॉल लग्न कार्यालयासाठी मंगल कार्यालयाची मागणी केलेली आहे. मात्र या ठिकाणी हॉटेल व्यवसाय व त्यासोबतच दारू विक्रीचा व्यवसाय सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहे. येथे दारु विक्री सुरू झाल्यास महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागणार असून सोबतच परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना दारू विक्रीपासून धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे या भागात दोन खून देखील झालेले आहेत. त्यामुळे कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचाही धोका वाढला आहे. या सर्व बाबींचा विचार करता संबंधित व्यवसायाला दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी महिलांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली.