कोरोना काळात कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना होतेय कसरत
जळगाव : सध्याचा कोरोना काळ अतिशय संवेदनशील काळ म्हटला जात आहे. या परिस्थितीत महिला पोलिसांची कुटुंब सांभाळून कर्तव्य पार पाडताना मोठी कसरत होत आहे. लेकरांना घरी ठेवून त्यांना रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाणे असो किंवा तपासावर काम करावे लागत आहे. ना लेकरांना वेळेवर जेवण देऊ शकत, ना पती व सासू-सासऱ्यांची काळजी घेऊ शकत, अशी परिस्थिती महिला पोलिसांवर ओढवलेली आहे. त्यातही रात्री उशिरा घरी गेल्यानंतर कोरोनाची भीती आहेच. बाहेर ड्युटी करत असताना अनेक लोकांशी संपर्क येतो, त्याचा संसर्ग कुटुंबात होऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घ्यावी लागत आहे. ठाणे अंमलदार, आरपीएसओ, सीसीटीएनएस या ठिकाणी रोज सहा ते आठ तासांची ड्युटी असते. त्याशिवाय कोरोनामुळे बाहेर रात्री आठ वाजेपर्यंत ड्युटी करावी लागत आहे. एखाद्या गुन्ह्यात महिला आरोपी असेल तर तेथे जाण्यासह तपासासाठी बाहेरगावीदेखील जावे लागते. पूर्वी महिला चूल आणि मूलपर्यंत मर्यादित होती, आता मात्र त्यात बदल झालेला आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला रस्त्यावर उतरत आहेत, इतकेच नाही तर महिला पोलीस लेकरांना घरी ठेवून रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
कुटुंबाची काळजी मोबाइलवरूनच
कोरोनाच्या भीतीमुळे कुटुंबातील वृद्ध सासू-सासरे, आई-वडील व लहान मुलांना त्रास होऊ नये यासाठी त्यांच्या जवळ जाणे शक्यतो टाळले जात आहे. त्यामुळे मोबाइलवरच त्यांच्याशी संवाद साधला जात असून प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. व्हिडीओकाॅलच्या माध्यमातून थेट लाइव्ह संवादावर अधिक भर दिला जात आहे.
कोट...
आम्ही पती, पत्नी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने मुलांना गावाला पाठवून दिले होते. दीड वर्ष मुलांची भेट झाली नाही. कोरोनामुळे तर शवविच्छेदनगृहातही जाण्याची वेळ आली आहे. एका कारवाईच्या वेळी २० ते २५ महिलांनी घेरून घेतले होते. मुलांपासून कधी लांब राहिली नव्हती, पण कोरोनाने ती वेळ आणली.
- रेखा इशी, महिला पोलीस नाईक
कोट....
गेल्या वर्षी कोरोना काळातच गर्भवती होते. प्रसूतीनंतर काही दिवसांतच मुलीला सासरी रावेर येथे पाठवून दिले आहे. अजूनही मुलगी गावालाच आहे. आठवड्यातून एक दिवस तिच्या भेटीसाठी रावेरला जाते. रात्रीच्या वेळी पोलीस ठाण्यात ड्युटी करताना रेल्वे रुळावर मृतदेहाचा पंचनामा करण्यासाठी जावे लागते.
- दीपिका महाजन, महिला पोलीस
कोट...
कुसुंबा येथे पती-पत्नीच्या खून प्रकरणात महिला आरोपींच्या चौकशीसाठी रात्रभर बाहेर राहावे लागले होते. एरव्हीदेखील उशिरापर्यंत कामकाज करावेच लागते. महिला आहे म्हणून नाकारून चालत नाही.
- सविता परदेशी, महिला पोलीस
एकूण पोलीस अधिकारी -१८६
महिला पोलीस अधिकारी -१२
एकूण पोलीस -३२२३
महिला पोलीस -३४८
महिला पोलिसांच्या मुलांच्या प्रतिक्रिया
आई पोलीस खात्यात असल्याचा अभिमान आहे. सण, उत्सव किंवा बाहेर फिरायला कुठे जायचे असेल तर आईच्या ड्युटीमुळे शक्य होत नाही. बंदोबस्ताच्या वेळी आई रात्री बाहेर असते तेव्हा भीती व चिंता वाटते.
- चेतन दिलीप साळवे
----
कोरोनामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण आहे. आई सतत ड्युटीच्या निमित्ताने बाहेर असते. बंदोबस्त व तपासाच्या वेळी तर रात्री घरी यायला उशीर होतो. कर्तव्य महत्त्वाचे असल्याचे आई नेहमी सांगत असते.
- सेजल प्रमोद भालेराव
-------
कोट.....
महिलांना पोलीस खात्यात रात्रीची ड्युटी करणे म्हणजे एक आव्हानच आहे. अशाही परिस्थितीत आई पोलीस खात्यात नोकरी करते. कोरोनामुळे तर त्या आमच्यापासून लांबच असतात.
- तृप्ती दिनकर धंडारे