ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 - जळगाव शहरातील भिकमचंद जैन नगर, गुड्डूराजा नगर, प्रेमनगर, कांचननगर व ढाके कॉलनी या भागात दारु दुकाने सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून त्यांना परवानगी देऊ नये, या मागणीसाठी या भागातील शेकडो महिलांसह नागरिक गुरुवारी जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात धडकले.
मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यासह आत्मदहन करण्याचा इशारा या भागातील महिलांनी दिला. राष्ट्रीय व राज्य मार्गावरील दारु दुकान बंद झाल्यानंतर परिसरातील दारु व्यावसायिक शहरातील विविध भागात दारु दुकान सुरू करण्यासाठी जागा घेत असून तशा जोरदार हालचाली सुरू आहे.
अशाच प्रकारे भिकमचंद जैन नगर, गुड्डूराजा नगर, प्रेमनगर, कांचननगर व ढाके कॉलनी या भागातही जागेचा शोध सुरू असल्याने या भागातील रहिवाशांनी दारु दुकानांना विरोध केला आहे. त्यामुळे या भागात दारु दुकानांना परवानगी न देण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय गाठले.
या भागात दारु दुकाने सुरू झाल्यास त्या पाठोपाठ खाद्य पदार्थांच्या गाड्याही लागतील. तेथे गर्दी झाल्यास महिलांनी कसे रहावे, असा प्रश्न उपस्थित करीत या भागातील कुटुंबातील महिला, तरुणी लहान मुलांचा विचार करावा, अशी मागणी लावून धरली.
या वेळी काही संतप्त महिलांनी पुढे येत आमची ही मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. प्रसंगी आम्ही आत्मदहनही करू, असेही सांगितले.