भडगाव : गोरगरीब लोकांना विविध शासकीय योजनेच्या अनुदानातून घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होऊ शकते. पंतप्रधान आवास योजना ब यादीनुसार, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आदी शासकीय योजनेतून गरीब लाभार्थ्याला अनुदान मिळते. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना ग्रामीण, शबरी आवास योजना ग्रामीण, पारधी आवास योजना ग्रामीण अशा सर्व घरकुलांच्या योजनेसाठी सन २०१६ ते २०२१ साठी एकूण ३४९० घरकुले मंजूर आहेत.
३४९० पैकी २३९९ घरकुलांची कामे पूर्ण झालेली आहेत तर भडगाव तालुक्यात एकूण १ हजार ९१ घरकुलांची कामे सुरू आहेत. प्रत्येक लाभार्थ्यास बांधकामास पहिला हप्ता १५ हजार रुपयांचा वितरित करण्यात आला आहे, तर भडगाव तालुक्यात जागा नसलेले एकूण १८८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, भडगाव तहसीलदार, पंचायत समिती प्रशासनाने मंजुरीसाठी पाठविले आहेत, अशी माहिती पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता हर्षल पाटील, रोशन पाटील यांनी दिली.
असे मिळते अनुदान
घरकुलासाठी शासनाकडून एकूण १ लाख २० हजारांचे अनुदान लाभार्थ्याला मिळते. हे अनुदान लाभार्थ्यांना ४ हप्त्यामध्ये मिळते. घरकुल मंजूर झाल्यानंतर पहिला हप्ता १५ हजार रुपयांचा मिळतो. घराच्या पायाचे बांधकाम झाल्यानंतर दुसरा हप्ता ४५ हजारांचा मिळतो. लिंटेल झाल्यावर तिसरा हप्ता ४० हजारांचा मिळतो. घराचे काम पूर्ण झाल्यावर २० हजारांचा हा शेवटचा हप्ता मिळतो. पंतप्रधान आवास योजनेचे २७९७ घरकुले मंजूर कामेही सुरू आहेत.
सन २०१६ ते २०२०, २०२१ पर्यंत तालुक्यासाठी ब याद्यानुसार भडगाव पंचायत समितीस एकूण २७९७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. २७९७ घरकुले मंजूर असून, भडगाव तालुक्यात ब यादीनुसार घरकुलांची कामेही सुरू आहेत. एका घरकुलासाठी शासनाकडून एकूण १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मिळते. शासनाच्या रोजगार हमी योजनेतून घरकुलाचे काम केले तर १८ हजार रुपये मजुरीपोटी मिळतात. सध्याच्या कामानुसार प्रत्येक लाभार्थ्यास घरकुल पहिल्या हप्त्याची रक्कम एकूण १५ हजार रुपयांपर्यंत वितरित करण्यात आली आहे. पहिला हप्ता एकूण २७९७ पैकी २५७५ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे.
या ब यादीतील घरकुलांची कामे लाभार्थ्यांनी ९० दिवसात पूर्ण करावी, अशी मुदत आहे. पंचायत समितीच्या आवारात घरकुलांबाबत आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. घरकुलांची कामे ९० दिवसांत पूर्ण करावी, अशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या.
दुसऱ्या हप्त्याची मागणी
दरम्यान, आतापर्यंत घरकुलांची कामे सुरू झाली. पहिल्या हप्त्याची रक्कम प्रत्येकी लाभार्थ्यास वितरितही करण्यात आली आहे. घरकुलांच्या कामास सुरुवात झाली आहे; मात्र ही घरकुलांची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. अनेक ठिकाणी घरकुलांची कामे बंद स्थितीत दिसून आलीत. घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाच्या मागणीनुसार वितरण करण्यात येत आहे.
प्रशासनाने वाळू उपलब्ध करावी
घरकुलांच्या कामांसाठी अनेकांना वाळू मिळत नसल्याने अडचणी येताना दिसत आहेत. गिरणानदी पात्रात काही गावांना बैलगाड्यांनी वाळु उचलु देत नाहीत. काही गावांना बैलगाड्यांनी वाळू उचलत घरकुलांची कामे होताना दिसत आहेत; मात्र दुसरीकडे वाळूअभावी घरकुलांच्या कामांना अडचणी वाढल्या आहेत.
१८८ लाभार्थ्यांचे जागा प्रस्ताव धूळ खात
पंतप्रधान आवास योजनेचे एकूण २७४४ घरकुलांची कामे तालुक्यात मंजूर आहेत. २७४४ पैकी २५७५ लाभार्थ्यांना पहिला अनुदानाचा १५ हजार रुपयांप्रमाणे हप्ता वितरित करण्यात आला आहे; मात्र यात १८८ घरकुल मंजूर लाभार्थ्यांना घरकुलासाठी सरकारी जागाच नाही. स्वत: ची जागा नसल्याने प्रस्ताव मंजूर असूनही घरकुल नामंजूर होतात. पहिला घेतलेला हप्ता शासनास परत करावा लागतो, अशीही काही उदाहरणे दिसून येतात.