लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी रुग्णालयात शंभर बेडचे डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर सुरू होणार असून याचे रविवारी दुपारपर्यंत १०० पैकी ६० बेडचे सर्व काम जवळपास पूर्णत्वास आले होते. तातडीने हे रुग्णालय उपलब्ध व्हावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून हालचाली गतिमान झाल्या होत्या. दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी सकाळी या रुग्णालयात पाहणी केली. यात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमची ट्रायल घेण्यात आली.
जळगावात रुग्णसंख्या वाढत असल्याने शिवाय यात ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे बेड मॅनेजमेंटचा मोठा गंभीर मुद्दा समोर आला होता. अखेर मोहाडी येथील महिला रुग्णालयात सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमचे काम सुरू करण्यात आले होते. नुकतीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, रविवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण उपस्थित होते.
साहित्य आणणार
शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात असलेले साहित्य या ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारपासूनच किंवा शक्य झाल्यास रविवारी सायंकाळपासूनच हे रूग्णालयातील ६० बेड सेवेत असतील अशी माहिती देण्यात आली.
काय होती स्थिती
पोर्चमध्ये फरशी बसविण्याचे व स्वच्छतेचे काम सुरू होते. मधील कक्षांमध्ये सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीमचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी असलेले जुने बेड उचलण्यात येत होते. या ठिकाणी नवीन बेड टाकण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. इलेक्ट्रीक फिटींगचे काम सुरू होते. काम पूर्ण करण्याची धावपळ या ठिकाणी सुरू होती. वरच्या मजल्यावरील चाळीस बेडचे काम सोमवार सायंकाळपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र, ६० बेड तातडीने उपलब्ध होतील, असे उपस्थितांनी सांगितले.