लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली ते कुसुंबा या दरम्यानच्या कामाला महिनाभरात सुरुवात करण्यात येणार आहे. या चार किमीच्या रस्त्यासाठी तब्बल ४० कोटींचा खर्च येणार आहे. त्यात विजेचे खांब हलविण्यापासून सर्व कामांना केली जाणार आहेत.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या जळगाव आणि जालना या दोन विभागांच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यात विविध रस्त्यांची कामे केली जात आहेत, तर जळगाव ते चाळीसगाव हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे विभागाकडे आहे. त्यामुळे हा चार किमीचा रस्ता धुळे विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला. या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला महिनाभरातच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कुसुंबा ते अजिंठा हा रस्ता जालना विभाग, कुसुंबा ते अजिंठा चौफुली हा रस्ता धुळे, शहरातून जाणारा महामार्ग आणि बाहेरून होत असलेला नवा चौपदरी बायपास हा जळगाव विभागाच्या अंतर्गत येतो.