जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद््भवलेल्या परिस्थितीमुळे खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या निधीलाही कात्री लावण्यात आली असून आगामी दोन आर्थिक वर्षांसाठी हा निधी मिळणार नसल्याचे नियोजन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील दोन्ही खासदारांचा गेल्या आर्थिक वर्षाचाही निम्मा निधी अद्याप मिळणे बाकी आहे. गेल्या वर्षी खासदार उन्मेष पाटील यांच्या खासदार निधीतून ६३ तर खासदार रक्षा खडसे यांच्या खासदार निधीतून १० कामे मंजूर आहेत.खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांसाठी दरवर्षी खासदारांना पाच कोटी रुपये विकास निधी मिळतो. त्यातून त्यांच्या मतदार संघात विविध विकास कामे केली जातात.मात्र सध्या कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटत असून आतापासून काटकसर करण्याचे धोरण सरकारतर्फे राबविण्यात येत आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम कार्यान्वयन विभागाच्यावतीने ८ एप्रिल रोजी परिपत्रक काढून खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमास् न राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०२०-२१ तसेच २०२१ -२०२२ या दोन वर्षांसाठी खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रम राबवू नये अशा सूचना देण्यात आल्या. त्या मुळे राज्याच्या नियोजन विभागानेदेखील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन तसे कळविले आहे.नवीन वर्षात एकाही कामाला मंजुरी नाहीजिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षात १ एप्रिलनंतर एकाही कामाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे निधी खर्चाचा सध्यातरी प्रश्न नाही. मात्र आता यानंतरही दोन वर्षे खासदारांना कामांची शिफारसदेखील करता येणार नाही.गतवर्षी ७३ कामांना मंजुरी२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी खासदार उन्मेष पाटील व खासदार रक्षा खडसे यांना प्रत्येकी अडीच कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. यातून खासदार पाटील यांच्या निधीतून ६३ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी ८२ कोटी ३३ लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. तसेच खासदार खडसे यांच्या १० कामांना मंजुरी देण्यात आली आहे.उर्वरित निधीची शाश्वती काय?या उपक्रमासाठी दरवर्षी मिळणाºया पाच कोटींच्या निधीपैकी दोन्ही खासदारांना प्रत्येकी अडीच कोटींचा निधी मिळालेला आहे. आता पुढील दोन वर्षे निधी मिळण्याचे संकेत नसल्याने गेल्या वर्षीचा निम्मा निधी मिळण्याचीही काय शाश्वती राहणार असा प्रश्न निर्माण होत आहे.
खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीस कात्री लावल्याने कामांना ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:47 AM