माजी नगराध्यक्ष अतुल पाटील व पालिकेचे विद्युत अभियंता पंकज पांडे यांनी साठवण तलावावर जाऊन पाहणी केली. आठवडाभरात वीजपुरवठा सुरू होणार असल्याचे नगरसेवक पाटील यांनी सांगितले.
येथील साठवण तलावासह जलशुद्धीकरण केंद्रावर साध्या फीडरद्वारे वीजपुरवठा होत असल्याने अनेक वेळा वीजपुरवठा खंडित राहत असल्याने शहरास पाणीपुरवठा करण्यात अडचणी निर्माण होतात.
हतनूर धरणावरून कालव्याद्वारे येथील जुन्या भालोद रस्त्यावरील साठवण तलावात शहरास सुमारे दोन महिने पाणी पुरेल एवढा साठा केला जातो. तेथून वीजपंपाने तो येथील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरणासाठी आणल्यानंतर तेथून २२ लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीतून शहरास जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यात कधी साठवण तलावावरील तर कधी पाण्याच्या जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडित राहत असल्याने पाणीपुरवठा करण्यात अडचणी येतात. दोन्ही ठिकाणी एक्स्प्रेस फीडर बसवण्यासंदर्भात माजी नगराध्यक्ष पाटील यांनी प्रयत्न केले. पालिकेने सुमारे ४२ लाख रुपयांच्या या योजनेस मंजुरी दिल्यानंतर फिडरचे काम अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी नगरसेवक पाटील, विद्युत अभियंता पांडे यांनी पाहणी केली. याप्रसंगी गणेश महाजन, धीरज महाजन, एजाज पटेल उपस्थित होते.