जळगाव : शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने वेग घेतला असून गुजराल पेट्रोल पंपापासून खोटेनगरपर्यंत बनणाऱ्या उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. याठिकाणी उड्डाणपुलाला लागूनच सर्व्हिस रोडचे काम पूर्ण झाले असून या मार्गावरून वाहतूकही सुरु झाली आहे.शहरातील आठ किलोमीटरच्या महामार्गाचे काम जांडू कंपनीकडे देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे या कामाला मार्च २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र हे सर्व काम नोव्हेंबरपर्यंत आठवण्याचे उद्दीष्ट कंपनीने ठेवले आहे. रुंदीकरणाच्या कामाने पावसाळ्यातही वेग घेतला आहे. या कामासाठी तीन पथके कार्यरत असून मानराज पार्क ते दादावाडी यादरम्यानच्या कामाला जास्त प्राधान्य दिले जात आहे. याठिकाणी मोठमोठ्या मशिनरी आणण्यात आल्या आहेत.अग्रवाल चौकाच्या ठिकाणीही रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने हे काम वेगात सुरु आहे. मानराज पार्क ते खोटेनगर या मार्गावरील काम सध्या सुरु आहे. मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडचे काम पूर्णत्वास गेले आहे. गुजराल पेट्रोल पंप ते दादावाडी यादरम्यान या सर्व्हिस रोडची उंची वाढवण्यात आली आहे. या उंच मार्गावरूनच सध्या वाहतूक सुरु आहे. यादरम्यानच उड्डाणपुलाचे काम होणार आहे.उड्डाणपुलासाठी दादावाडी तसेच गुजराल पेट्रोलपंप याठिकाणी भिंत उभारण्यात आली असून वासुकमल विहार या अपार्टमेंटसमोर खोदकाम करण्यात आले आहे.दादावाडी येथील प्रश्न कायमदरम्यान, महामार्गाचे काम एकीकडे वेगात सुरु असताना दुसरीकडे दादावाडी येथे बायपास रस्त्यावरील खड्ड्यांकडे मात्र कुणीच लक्ष पुरवलेले नाही. त्यामुळे जरा जरी पाऊस पडला तरीही या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. महामार्गावर अवजड वाहतूकही होत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. या प्रश्नाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.शिवकॉलनीजवळ उड्डाणपूल ?शिवकॉलनीजवळ महामार्गावर रेल्वे उड्डाणपूल असून त्याची अवस्था बिकट आहे. या पुलाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाकडे पाठवण्यात आला असून तो मंजूर झाल्यास शिवकॉलनीजवळही उड्डाणपूल होऊ शकतो.सध्या महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. लवकरात लवकर हे काम पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. गुजराल पेट्रोलपंपाच्या ठिकाणी महामार्गावर खोदाईचे काम करण्यात आले असून याठिकाणाहून उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी गुजराल पंप व दादावाडी याठिकाणी भिंतीचे काम करण्यात आले आहे.-भूपिंदर सिंग, अभियंता, जंंडू कंन्स्ट्रक्शन
महामार्गावर उड्डाणपुलाच्या कामाला अखेरीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 1:04 PM