मनवेल, ता.यावल : येथील मानकेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येत आहे. लोकसहभागातून सुरुवातीला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. मानकेश्वर महादेव मंदिर गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. जागृत देवस्थान आहे. युवक मंडळी व ग्रामस्थांच्या सहकार्याने दरवर्षी महाशिवरात्र एकादशीला विविध कार्यक्रम घेण्यात येतात. आलेल्या देणगीतून विकास कामे करण्यात येत असतात.महादेव मंदिराच्या एका बाजूला संरक्षण भिंत नाही. मंदिराला धोका असल्यामुळे येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने संरक्षण भिंत बांधून देणगीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्पना युवक मंडळीने घेतला आहे. दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून वर्गणी जमा करण्यात येत आहे.मंदिर परिसरात मोकळ्या जागेवर वॉल कंपाऊड करून वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावून निसर्गमय गार्डन करणे, मंदिराची उभारणी करणे, शेतातील रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या गुरा-ढोरांसाठी, शेतकरी व शेतमजुरांना पिण्याच्या पाणी व्यवस्था करणे यासह विविध कामे देगणीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.मंदिर जीर्णोद्धार करण्यासाठी देवीदास वसंत कोळी, नितीन हरी कोळी, शिवाजी भिका पाटील, गोकुळ नामदेव कोळी, पन्नालाल हुकूमचंद पाटील, गणेश श्रीपत कोळी, विनायक उखर्डू कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
मनवेल येथे लोकसहभागातून मानकेश्वर महादेव मंदिराचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 3:00 PM