लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणत्याही व्यक्तीसाठी काम करू नका, पक्षासाठी काम करा, गटबाजी टाळा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश आदिक यांनी दिला. पक्षाचे निरीक्षक म्हणून अविनाश आदिक हे बुधवारपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात महानगर आणि ग्रामीणचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यावेळी बैठकीत गटबाजी दिसून आली. आदिक म्हणाले की, जाहीरपणे आम्ही आढावा कसा घेणार आहोत. आढावा ही पक्षांतर्गत बाब असते. तसेच जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अजित पवार यायच्या आत हे सर्व दुरुस्त करा, असा सज्जड दमदेखील त्यांनी दिला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक यांनी गुुरुवारी सकाळी महानगरचा आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, प्रवक्ते योगेश देसले, सरचिटणीस नामदेव पाटील, विकास पवार, वाल्मीक पाटील उपस्थित होते.
महिला शहराध्यक्ष मंगला पाटील यांनी शहरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षात असलेल्या गटबाजीबद्दल उघडपणे आपली मते मांडली. त्यानंतर बोलतांना अविनाश आदिक म्हणाले की, अजित पवार हे जिल्ह्यात संपर्क प्रमुख म्हणून येणार आहे. ते येण्याच्या आधी या सर्व सेल कार्यरत करा, जिथे अडचणी आहेत. ती सर्व दुरुस्त करा, पुढच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी करा, अशा सूचनादेखील आदिक यांनी केल्या.
३६५ बुथ कमिटी मग उरलेच काय
शहरात ३ लाख ६८ हजार मतदार आहेत. त्यात ३६५ बुथ कमिट्या कार्यरत आहेत. आणि ३२ सेल आहेत एकूण १ लाख १२ हजार जण या द्वारे आपल्याशी जोडले गेले आहेत. मग उरतेच काय, ही आकडेवारी कागदावर चांगली वाटते. अजित पवार हे आता जिल्ह्यातील संघटनेशी जोडले जातील त्यानंतर त्यांनी येथे यायच्या आत सर्व कामे करा, असे देखील आदिक यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी गटबाजीवर केली उघड टीका
राष्ट्रवादी महानगरच्या बैठकीला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षात सुरू असलेल्या गटबाजीकडे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, बैठकीसाठी जे बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनरवर जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांचादेखील फोटो नाही. हे देखील कार्यकर्त्यांनी निर्दशनास आणून दिले. तसेच विद्यापीठात विविध कामांसाठी पाठबळ मिळत नसल्याची तक्रारदेखील काहींनी केली. सांस्कृतिक सेलचे सल्लागार रमेश भोळे यांनी विद्यापीठात नाट्यशास्त्र विभाग असावा, यासाठी पुरेसे सहकार्य होत नसल्याची खंत व्यक्त केली.
पालकमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्ता वाटपाचा तेथे फॉर्म्युला ठरला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळत नाही. त्याकडे पालकमंत्री दुर्लक्ष करत असल्याची तक्रारही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली. महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी देखील प्रास्ताविकात पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिल्हास्तरीय विविध समित्यांमध्ये स्थान मिळत नसल्याचे सांगितले.