लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची व त्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत कोरोना बाधित व संशयित रुग्णाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील जागा शिल्लक राहत नसल्याने मनपा प्रशासनाने एमआयडीसी परिसरात नवीन स्मशानभूमी तयार करण्याच्या कामाला शुक्रवार पासून सुरुवात केली आहे.
शुक्रवारी दुपारी १ वाजता मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, शहर अभियंता अरविंद भोसले व मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी एमआयडीसी भागातील एका खुल्या भूखंडाची पाहणी करून या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात स्मशान भूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मनपा अधिकाऱ्यांसोबत एम.आय.डी.सी. मधील अधिकारी व काही उद्योजक देखील उपस्थित होते. महापालिका या खुल्या भूखंडावर काही शेड उभारून त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड तयार करणार आहे. तसेच पाण्याची व्यवस्था देखील महापालिका प्रशासनाकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे. लोकसहभागातून या ठिकाणी नवीन सात ओटे तयार करण्यात येणार आहेत. यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना करावी लागणारी वेटिंग थांबणार आहे. त्यानुसार शुक्रवारपासूनच या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
नेरी नाका स्मशानभूमीत एकाच दिवशी ५० जणांवर अंत्यसंस्कार
शहरात कोरोना रुग्णांची संख्या व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील आता भयावह स्थितीत येऊन पोहोचली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात कोरोनामुळे ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी नेरी नाका स्मशान भूमीत एकाच दिवसाला ५० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यामध्ये पाच कोरोना बाधित यांचा समावेश असला तरी इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढली आहे. प्रशासनाकडून या रुग्णांना संशयित किंवा सारीचे रुग्ण म्हणून गणले जात आहे. मात्र शहरात होणाऱ्या मृत्यूंची संख्या पाहता कोरोना व्यतिरिक्त इतर आजारामुळे मृत्यू वाढत असल्याचेही समोर येत आहे.