शिरसोली प्र.बो. व प्र.न. या दोन्ही गावांची पाणीपुरवठा योजना ३० वर्षांपासून सामूहिक असून, या पाणीपुरवठा योजनेमध्ये दापोरा येथील गिरणा नदीच्या काठावरील विहिरीवरून होत होता, परंतु जस जसे गावाची लोकसंख्या वाढत गेली, तसतसा गावाला होणारा पाणीपुरवठा हा दोन दिवसांवरून दहा दिवसांवर गेला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रीय पेयजल योजना २०१९ अंतर्गत शिरसोली प्र.बो. गावासाठी स्वतंत्र एक कोटी ६२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, या योजनेच्या कामाला जानेवारी, २०२१ मध्ये सुरुवात झाली. यात विहिरीचे तसेच पाइप टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर चार लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यास लवकरच सुरुवात होणार आहे. सात ते आठ महिन्यांत प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील यांनी सांगितले.
नव्याने होणारी पाणीपुरवठा योजना गावापासून पाच ते सहा कि. मी. अंतरावर असून, या विहिरीसाठी धानोरा ग्रामपंचायतने गिरणा काठी गावठाणची जागा दिली आहे. या ठिकाणी २५ फूट व्यास व पन्नास फूट खोल असे विहिरीचे कामपूर्ण झाले आहे.