लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले लिक्वीड ऑक्सिजन टँक कार्यन्वयीत करण्याच्या पहिल्या प्रक्रियेला अर्थात या ठिकाणाहून पाईपलाईन टाकण्याच्या कामाला अखेर सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. चार दिवस हे काम चालणार आहे. मात्र, पेसो समितीकडून अद्यापही मंजूरी मिळालेली नाही.
गेल्या दोन महिन्यांपासून टँक दाखल झाला असून पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले होते. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून पत्रही देण्यात आले होते. वांरवार पत्र देऊनही कामाला सुरूवात होत नव्हती, अखेर सोमवारपासून या कामाला सुरूवात करण्यात आली असून कक्ष तेराच्या वरती इमारतीवर तीन कामगार हे पाईपलाईन जोडण्याचे काम करीत होते. यानंतर इमारतीच्या अर्धापर्यंत ही पाईपलाईन नेण्यात येणार आहे. मध्ये थोडे बांधकाम करून त्यावरून ही पाईपालाईन व्हेपोरायझरला जोडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पॅनलला जोडण्यात येणार असून त्यामाध्यमातून मुख्य पाईपलाईनद्वारे थेट बेडपर्यंत ऑक्सिजन पोहचणार आहे.
मंजुरीची मान्यता
पाईपलाईन झाल्यानंतर याबाबचा परवाना येण्यासाठी पेसो समितीची मान्यता लागणार असून त्यासाठी अद्याप पाहणी झालेली नाही. समितीने पाहणी केल्यानंतर या टँकला मंजूरी मिळणार आहे. मध्यंतरी लिक्विडसाठीही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात पाचव्या दिवशी या निविदा उघडण्यात आल्या होत्या.