‘महारेल’च्या अधिकाऱ्यांची माहिती : ‘आर्म’चा प्रश्न मनपाने सोडवावा; पाच लाख नागरिकांचा वाहतुकीचा मार्ग होणार सुरळीत
- जळगाव शहरासह, जळगाव तालुका व चोपडा, यावल तालुक्यातील नागरिकांना होणार लाभ
- एस. के. ऑईल मिल ते रिंगरोडदरम्यान होणार पूल
- सुरत , मुंबई रेल्वेलाईनवरून होणार क्रॉस
- रेल्वेच्या महारेल कंपनीकडून होणार पुलाच्या कामाला सुरुवात
-डिझाईन तयार, केंद्राचीही मिळाली तांत्रिक मंजुरी
-आर्मसाठी मनपाकडून भूसंपादनाची प्रक्रिया मात्र प्रलंबितच
--
- ४५० मीटर लांबीचा होणार पूल
- ५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
- ५ वर्षांपूर्वी झाली होती घोषणा
- २६ महिन्यांची मुदत
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. मात्र, अद्याप या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत जळगावकरांसह जिल्ह्यातील सुमारे ५ लाख नागरिकांच्या दृष्टीने सोयीस्कर होईल, अशा पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला येत्या महिनाभरात सुरुवात होणार असल्याची माहिती महारेलचे असिस्टंट मॅनेजर संजय बिराजदार यांनी ‘लोकमत’ला दिली. रेल्वेने सर्व तांत्रिक मान्यता पूर्ण केल्या असून, आता या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचे बिराजदार यांनी सांगितले.
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तब्बल पाच वर्षांपूर्वी या पुलाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक मान्यता, निधीची उपलब्धता अशा समस्यांमुळे या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यात पुलालगत भोईटेनगरकडून येणाऱ्या आर्ममुळेदेखील या कामाला तब्बल दोन वर्षे उशीर झाला. आता रेल्वे प्रशासन कोणत्याही फेऱ्यात न अडकता थेट पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आग्रही आहे. आधीच या पुलाच्या कामाला उशीर झाला आहे.
१. पाच लाख नागरिकांचा प्रश्न सुटेल
भविष्यात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मार्गी लागल्यानंतर बरीच वाहतूक या पुलावरून होणार आहे. पिंप्राळा उड्डाणपुलाचे काम झाल्यास कानळदा, आव्हाणे, ममुराबाद या गावांसह चोपडा व यावल तालुक्यातील बरीच वाहतूक जी रिंगरोडकडे येणारी आहे. अशी वाहतूक शहरातील मुख्य भागातून न येता, थेट या पुलाकडून रिंगरोडकडे येऊ शकणार आहे. कानळदा रस्त्याकडील एस. के. ऑईल मिल ते रिंगरोड दरम्यान हा पूल होणार आहे. यामुळे वाहनधारकांना सुरत रेल्वेगेट, बजरंग बोगदा या भागाकडे जाण्याची गरज पडणार नाही.
२. नेहमीच्या वाहतुककोंडीचा त्रास संपणार
पिंप्राळा रेल्वेगेटवरून दिवसाला तब्बल ६५ ते ७५ रेल्वे ये-जा करतात. यामुळे हे रेल्वेगेट दिवसातून बऱ्याचवेळा बंद असते. हे गेट बंद राहात असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
आर्मचा प्रश्न मनपाने सोडवावा, रेल्वे आपले काम करणार
पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलांतर्गत भोईटेनगरकडून एक आर्म जोडण्यात यावा, अशी मागणी मनपातील नगरसेवकांकडून केली जात होती. आधी आर्मसाठी जागा उपलब्ध नसल्याने रेल्वेने बजरंग बोगदालगत नवीन बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव मनपाकडे ठेवला होता. मात्र, मनपाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर मनपाने आर्मसाठी काही मालमत्तांचे भूसंपादन करून भोईटेनगरकडून आर्म तयार करण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करून घेतला. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मनपाने या आर्मसाठी मालमत्ता भूसंपादीतही केल्या नाहीत वा इतर मार्गही काढला नाही. या आर्मच्या फेऱ्यामुळे आधीच पुलाच्या कामाला उशीर झाला आहे. यामुळे मनपाने त्यांचा प्रश्न मार्गी काढावा, आता रेल्वे प्रशासन थांबायला तयार नसून, या पुलाचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
कोट..
काही तांत्रिक मान्यतांसाठी या पुलाचे काम रखडले होते. मात्र, आता सर्व प्रकारच्या मान्यता मिळाल्या असून, महिनाभरात महारेलकडून या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
- संजय बिराजदार, असिस्टंट मॅनेजर, महारेल
आर्मसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. याबाबत संबंधित मालमत्ताधारकांची सुनावणी प्रक्रिया घेतली जाईल. आर्ममुळे पुलाच्या कामाला कोणताही अडथळा नाही. भूसंपादनाचे काम झाल्यानंतर आर्मचेही काम होऊ शकणार आहे.
-सतीश कुलकर्णी, आयुक्त, मनपा