जळगाव- शहरातील मोहाडी रोड परिसरात असलेल्या नूतन वर्षा कॉलनीतील श्री विठ्ठल रुखमाई उद्यानाला संरक्षक भिंत उभारण्याच्या कामाला रविवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. नूतन वर्षा कॉलनीतील श्री विठ्ठल रुखमाई मंदिराच्या बाहेरील मोकळ्या उद्यानाला संरक्षक भिंत आणि जाळी उभारण्याच्या १८ लाखांच्या कामाला मान्यता देण्यात आलेली आहे. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, ज्योती चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
फेब्रुवारी महिन्यातच पारा ३८ अंशावर
जळगाव - जिल्ह्यातील तापमानात आता वाढ होवू लागली असून, साधारणपणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या मध्यानंतर तापमान वाढायला सुरुवात होत असते. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्यातच जळगाव शहराचा पारा ३८ अंशापर्यंत पोहचला आहे. फेब्रुवारी महिन्यात शहराचा कमाल तापमान हे ३३ ते ३५ अंशापर्यंत असते. मात्र, यंदा पारा ३८ अंशापर्यंत गेल्याने फेब्रुवारी महिन्यातच जळगावकरांना उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसातच पारा ४० अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शासनाने मागविली शहर विकास योजनेच्या आराखड्याची माहिती
जळगाव - शहरविकास योजनेच्या आराखड्याचा कामाबाबत मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या तक्रारीनंतर नगरविकास मंत्रालयाने या योजनेबाबतची सर्व माहिती सादर करण्याचे आदेश मनपा प्रशासनाला दिले आहेत. शहर विकास योजनेतील आरक्षणात ७० टक्के आरक्षण उच्च न्यायालयाने व्यपगत केलेले असतानाही भाजपचे माजी स्थायी समिती सभापती यांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप व आर्थिक देवान-घेवाण होत असल्याचा आरोप सुनील महाजन यांनी केला होता. तसेच जमिनी हडप करण्याचा गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप करून, याबाबत नगरविकास राज्यमंत्र्यांकडे महाजन यांनी तक्रार केली होती. याबाबत राज्य शासनाने मनपाला हा अहवाल पाठविण्याचे आदेश दिले डिसेंबर महिन्यात दिले आहेत.