जामनेर, जि.जळगाव : श्रम, प्रतिष्ठेच्या बळावर जगभरात पोहचलेली नानासाहेब धर्माधिकारी यांच्या श्री साधकांची चळवळ समाज परिवर्तनाचे काम करीत आहे. साधकांनी स्वच्छतेची, वृक्ष लागवडीसह इतर केलेली कामे समाजाला मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी शुक्रवारी सकाळी येथे केले.महाराष्ट्रभूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या येथील सेवेकऱ्यांनी जळगाव रस्त्यावर व पुरा भागात कस्तुरीनगर जवळ उभारलेल्या दोन प्रवेशद्वाराचे व वाचनालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी निंबाळकर व नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते झाले.बाजार समितीच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सांगितले, मनातील अज्ञानाचा अंध:कार मिटविण्यासाठी पेटविलेली ज्योत व त्यातून निर्माण झालेल्या प्रकाशाला महत्त्व आहे, असा अंधार दूर करण्याचे कार्य नानासाहेबांनी केले. समाजातील प्रत्येक घटकाने कौटुंबीक, सामाजिक नियम पाळले तर कायद्याचा वापर करावा लागणार नाही.जि.प.चे अध्यक्ष दिलीप खोडपे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, चंद्रकांत बाविस्कर, संजय गरुड यांनी आपल्या भाषणात धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव केला. प्रास्ताविक संजय विसपुते यांनी केले. विवेक चौधरी यांनी संचलन केले तर आभार प्रकाश माळी यांनी मानले.कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, रुपाली पाटील, विद्या खोडपे, नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे, प्रा.शरद पाटील, बाबूराव हिवराळे, शीतल सोनवणे, मंगला माळी, लीना पाटील, ज्योती सोन्ने, ज्योती पाटील, सुनीता पाटील, ज्योत्स्ना विसपुते, आतिष झाल्टे, दीपक तायडे, अशोक नेरकर, रमण चौधरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुक्यातून हजारो श्री सेवकांची उपस्थिती होती.
श्री सेवक चळवळीकडून समाज परिवर्तनाचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 7:29 PM