लोकमत न्यूज नेटवर्क
-घनकचरा प्रकल्पासाठी पहिला डीपीआर मंजूर - ८ एप्रिल २०१८
- प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली - जून २०१९
- कार्यादेश देण्यात आला - २० सप्टेंबर २०१९
- कामाची मुुदत - १९ आॅक्टोबर २०२०
- सद्यस्थितीत कामाची स्थिती - घनकचरा प्रकल्पाच्या कामाला अद्यापही सुरुवात नाही.
- घनकचरा प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार करण्यात आला - फेब्रुवारी २०२१
------
- ८ वर्षांपासून प्रकल्प बंद
- दररोज २५० टन कचरा बंद प्रकल्पात टाकला जातो
- जळगाव शहरातील सुमारे ७ कॉलन्यांमधील नागरिकांना होतो धुरामुळे त्रास
- आव्हाणे, भोकणी, आव्हाणी, बांभोरी व खेडी या पाच गावांमधील २० हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात
-१ लाख मेट्रिक टन हून अधिक कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून
- घनकचरा प्रकल्पासाठी १२ कोटींची निविदा लक्ष्मी कन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे.
जळगाव - महापालिकेचा आव्हाने शिवारातील बंद पडलेल्या घनकचरा प्रकल्प कामाची मुदत ऑक्टोबर २०२० मध्येच संपली असूनदेखील महापालिकेने अद्यापही घनकचरा प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केलेली नाही. महापालिकेने याआधी घनकचरा प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेला डीपीआर शासनाकडून नामंजूर करण्यात आल्यानंतर, फेब्रुवारी २०२१ मध्ये महापालिकेने नवीन डीपीआर तयार केला असून हा डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महापालिका प्रशासन घनकचरा प्रकल्पाच्या विषयावर ढीम्म झालेले पहायला मिळत आहे. आधी दुसऱ्या शहराचा कॉपी-पेस्ट केलेला डीपीआर तपासणी न करताच मंजुरीसाठी पाठविला. यामध्ये ' निरी ' ने मनपा प्रशासनाने मंजुरीसाठी पाठवलेला घनकचरा प्रकल्पाचा डीपीआर हा इतर महापालिकेचा कॉपी-पेस्ट केलेला डीपीआर असल्याचे सांगत महापालिकेचा डीपीआर नामंजूर केला होता. तसेच मनपाला नव्याने डीपीआर तयार करून पाठविण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने घनकचरा प्रकल्पाच्या कामासाठी मक्तेदाराला कार्यादेश देवूनही वेळेवर काम सुरू केले नाही. त्यातच काम सुरू न करताच या कामाची मुदतदेखील संपली आहे.
घनकचरा प्रकल्पाच्या कामाबाबत महापालिका प्रशासनाला गांभीर्य नाही
१.आठ वर्षांपासून हा प्रकल्प बंद आहे. याबाबत हरित लवादाने देखील मनपावर ताशेरे ओढले आहेत. याबाबत मनपा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येते.
२. घनकचरा प्रकल्प शहरात सुरू नसल्याने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात महापालिकेला दरवर्षी ५०० गुणांवर पाणी फेरावे लागते. यामुळे शहराची स्वच्छ सर्वेक्षणात पिछेहाट या ५०० गुणांचे महत्व मनपा प्रशासनाला नसल्याचेच दिसून येते.
३. शहरातील ७ कॉलन्यांमधील २० हजार ते परिसरातील ५ गावांमधील १५ हजार मिळून सुमारे ३५ हजार नागरिकांना प्रकल्पातून निघणाऱ्या धुरामुळे होतो त्रास. मनपा प्रशासन भोपाळसारख्या मोठ्या वायू दुर्घटनेची वाट पाहत आहे का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
४ कचऱ्याला लागणाऱ्या आगीतून मिथेन वायूू बाहेर निघतो तसेच धुरामुळे अनेकदा सुरत रेल्वेलाईनवर दिसेनासे झाल्याने तीन वेळा रेल्वेही थांबविल्याचा घटना घडल्या आहेत.
अजूनही एक लाख टन कचरा प्रक्रियेविना पडूनच
या ठिकाणी बायो मायनिंगदेखीलचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम सहा महिन्यांत होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून हे काम सुरू आहे. अद्यापही घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणावरील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आलेली नाही. याठिकाणी सद्यस्थितीत एक लाख मेट्रिक टन कचरा कुठल्याही प्रक्रियेविना पडून आहे. या कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरत असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यदेखील मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांसह अनेक पर्यावरणप्रेमींनीदेखील महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र महापालिका प्रशासन अजूनही याबाबत गांभीर्याने विचार करताना दिसून येत नाही.
कोट..
कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार आहे. याबाबत बायोमायनिंगच्या कामाचा वेग वाढविण्याचा सूचना दिल्या आहेत. यासह घनकचरा प्रकल्पासाठीच्या नवीन डीपीआर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून लवकरच या डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
-अरविंद भोसले, बांधकाम अभियंता, मनपा