दोन वर्षांपूर्वी रेल्वे स्टेशनवरील जीर्ण दादरा काढल्यानंतर या ठिकाणी रेल्वे प्रशासनातर्फे नवीन दादरा बांधण्यात येत आहे. नवीन दादरा हा पूर्वीच्या दादऱ्यापेक्षा विस्ताराने मोठा असल्यामुळे, गर्दीतही प्रवाशांना सुरक्षित आणि तत्काळ स्टेशनमधून बाहेर पडता येईल असा आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या दादऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, जिन्याचे काम रखडले आहे. स्टेशनबाहेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होणारा हा दादरा थेट शिवाजीनगरच्या बाजूने असलेल्या प्लॅटफार्म क्रमांक ६ पर्यंत तयार करण्यात आला आहे. प्रवाशांना प्लॅटफार्म क्रमांक ६ वर उतरविण्यासाठी दादऱ्याच्या दोन्ही बाजूला जिना काढण्यात आला आहे. यातील डाव्या बाजूच्या जिन्याचे काम पूर्ण झाले असून, उजव्या बाजूच्या जिन्याचे काम मात्र बंद आहे. या ठिकाणी शिवाजीनगरकडून येणारी महावितरणची उच्च क्षमतेची वाहिनी गेली आहे. शिवाजीनगरच्या बाजूने जिना उतरविताना या तारा विद्युत तारांचा रेल्वे प्रशासनाला अडथळा येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सध्या हे काम बंद ठेवले आहे.
इन्फो :
रेल्वेचे महावितरणला पत्र :
महावितरणच्या विद्युत तारांमुळे या नवीन दादऱ्याच्या जिन्याचे अंतिम काम रखडले असल्याने, या अडथळा ठरणाऱ्या तारा हटविण्याबाबत रेल्वे प्रशासनाने महावितरण प्रशासनाला पत्र पाठविले आहे. यावर महावितरण प्रशासनाने शिवाजीनगर उड्डाणपुलावरील उच्च दाबाच्या विद्युत तारा व खांब हटवितांना स्टेशनवरील ताराही हटविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाला कळविले आहे. त्यामुळे जो पर्यंत उड्डाणपुलावरील विद्युत तारा व खांब हटविले जाणार नाहीत, तो पर्यंत स्टेशनवरील ताराही हटणार नसल्यामुळे या कामाला अधिकच विलंब होणार आहे.
अन् प्रवाशांना लागली उद्घाटनाची प्रतीक्षा :
रेल्वे स्टेशनवरील उभारण्यात आलेल्या नवीन दादऱ्याचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून, या ठिकाणी पथदिवे व सीसीटीव्हींही बसविण्यात आले आहेत. तसेच दादऱ्याला रंगरंगोटीही देण्यात आली असून, अनेक प्रवासी या ठिकाणाहून उद्घाटनापूर्वीच वापर करत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या नवीन दादऱ्याचे उद्घाटन करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.