जळगाव - गेल्या सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे रखडलेल्या भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचा अखेर मुहूर्त सापडला असून या कामाला सुरूवात झाली आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून या मार्गासाठी सात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. हे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे विभागाने सन २०१७ मध्ये भादली रेल्वे गेट क्रमांक १५३ कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी ‘लोकमत’ने भादली रेल्वे फाटक बंद झाल्यास उद्भवणाऱ्या समस्यांविषयीचा पूर्ण लेखाजोखा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
या ठिकाणी आतापर्यंत एकूण सात गर्डर टाकण्यात आले आहे.आरसीसी बॉक्स टाकण्यासाठी माती खोदण्याचे काम सध्या सुरू आहे.येत्या १५ एप्रिल पर्यंत भुयारी मार्गाचे काम पूर्णत्वास येईल, अशी माहिती रेल्वे निर्माण विभागाचे उपअभियंता पंकज धाबारे यांनी ‘लोकमत’ला दिली.