शासकीय पशुवैद्यकीय सेवेस खेड्यापाड्यात मर्यादा पडत आहेत. या प्रश्नी लवकर मार्ग निघावा, अशी पशुपालकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दरम्यान, तालुक्यात मागील दोन वर्षांत हजारो संकरित गायींची संख्या वाढली आहे. या दुभत्या गायी-म्हशींना पावसाळ्याचे दिवस असल्याने, विविध आजार होत आहेत. ही जनावरे शासकीय पशुधन दवाखान्यात नेण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होतात.
गावी गोठ्यातच खासगी पशुधन पर्यवेक्षकांकडून उपचार करण्यात शेतकऱ्यांचा वेळ वाचतो, शिवाय जनावरे पाच-दहा किमीवर शासकीय पशू दवाखान्यात नेण्यात प्रचंड गैरसोय होते. यामुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामातील कामाचे दिवस असल्याने, औताची बैलजोडी आदी पशुधनावर उपचारासाठी अडचणी येत आहेत.
पशुवैद्यक आयुक्तालयाने १९८४च्या पशुवैद्यक कायद्यान्वये पदविकाधारक पशुधन पर्यवेक्षक व सेवकांवर खासगी पशुउपचार करण्यास मर्यादा आल्या आहेत, शिवाय त्यांच्यावर बोगस म्हणून कारवाईचे संकेत आहेत. या कारणावरून खासगी पशुसेवकांच्या संघटनेने कामबंद आंदोलन छेडले आहे.
मागील दोन दिवसांपासून संकरित गायीवर उपचारासाठी खासगी पदविकाधारक पशुसेवक येत नसल्याने, दोन-चार शेतकरी यांनी पशुंचे आरोग्य धोक्यात आल्याची चिंता आपणाकडे मांडली. दुभती जनावरे दगावल्यास लाखोंचा फटका बसत, दूधव्यवसाय संकटात येणार आहे.
-स्वरूपसिंग पाटील, माजी सरपंच, शिवणी