लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगावच्या एका महिलेची आरोग्यसेविका म्हणून निवड झाली. त्या नियुक्तीच्या आनंदासोबतच हाती पडले ते धुळे जिल्ह्यतील एका आदिवासी पाडा शेनबारी येथील नियुक्तीचे पत्र. नोकरी मिळाल्याच्या आनंदासोबत उभे राहिले होते आव्हान. मात्र हे आव्हान सुफळ करणाऱ्या जळगावच्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या प्रेमलता पाटील.
प्रेमलता पाटील यांचे पती जळगावला उत्तर महाराष्ट्र् विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांचे आठ जणांचे संयुक्त कुटुंब आहे. चार खोल्यांच्या या घराला सांभाळत त्यांनी कोरोनाच्या कठीण काळात रुग्णसेवादेखील केली. त्यांचा प्रवास शेनबारी, जि. धुळे येथून सुरू झाला. जळगावला कुटुंब आणि शेनबारीला कर्तव्य अशी तारेवरची कसरत प्रेमलता पाटील यांनी पूर्ण केली. शेनबारी हे उपकेंद्र सुखापूर पीएचसीच्या अंतर्गत येते. सुरुवातीला शेनबारीला त्यांच्या मदतीला कुणीच नव्हते. मात्र नंतर हळूहळू आशा सेविका त्यांच्या मदतीला आल्या. काही काळ तेथे रुग्णसेवा केल्यावर त्यांनी जळगावला आंतरजिल्हा बदलीसाठी प्रयत्न केले. त्यांना यात चिनावल, ता. रावेर येथील आरोग्य केंद्रात कार्यभार देण्यात आला. त्यानंतर तेथेही त्यांनी आपली रुग्णसेवा दिली. २०१९ मध्ये त्यांना जळगाव खुर्द येथील आरोग्य केंद्रात नियुक्त करण्यात आले. त्यांना वाटले एवढ्या वर्षांनंतर प्रथमच घराच्या काही जवळ का होईना पण नियुक्ती मिळाली आहे. मात्र हे सुख देखील त्यांच्या नशिबात फार दिवस टिकले. नाही. लगेचच कोरोनाच्या मोठ्या आव्हानाचा डोंगर सर्वांसमोर आला. त्यात आरोग्य सेविका म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आली. लहान घरात राहून संयुक्त कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्यामुळे लागण होऊ नये, ही चिंता सतावत असतानाच त्यांना आपले कर्तव्य देखील करावे लागले. त्यांनी कर्तव्यासोबतच कुटुंबाचीही काळजी घेतली. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा फ्लॉरेन्स नाईटिंगेल हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच ८ मार्च रोजी त्यांना पुन्हा एकदा जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार केला जाणार आहे.
कठीण प्रसूतीला केली मदत
चिनावलाला असतानाच कार्यालयातील एका महिलेच्या मुलीला रुग्णालयात प्रसूतीसाठी आणण्यात आले. गर्भवती महिलेचे हिमोग्लोबिन हे फक्त सातवर आले होते. रुग्णालयातील डॉक्टर कामानिमित्त जळगावला आले होते. कठीण प्रसंग होता. मात्र तिची परिस्थिती पाहता दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगणे देखील शक्य नव्हते. त्यामुळे तेथेच प्रसूतीसाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. फैजपूर येथील एका स्त्रीरोग तज्ज्ञांना फोन करून मदत मागितली. त्यांनी त्याला प्रतिसाद दिला. त्यांनी फोनवरच दिलेल्या सूचनांनुसार काम केले. काही वेळाने रुग्णालयातील डॉक्टर परत आले. त्यांनी या कामाबद्दल माझे कौतुक केले. या कठीण प्रसंगात मदत केल्याचे समाधान कायम राहील. - प्रेमलता पाटील, आरोग्य सेविका