लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा पातळीवरच ऑक्सिजनची निर्मिती व्हावी यासाठी ऑक्सिजन निर्मिती प्लान्ट (एअर जनरेटर)चे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. सध्या आपत्ती व व्यवस्थापनातून जिल्ह्याला पाच एअर जनरेटर मिळू शकतात. ते दहापर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
याबाबतचा शासनाचा आदेश मंगळवारीच मिळाला आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्याबाबतच्या कार्यवाहीला तातडीने सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ऑक्सिजनचाही तुटवडा भासत आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातच कृत्रिम ऑक्सिजन तयार करण्याचे प्लान्ट सुरू करता येतील का यावर चर्चा केली होती. आता सध्या शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हापातळीवर पाच प्रकल्प उभारले जाऊ शकतात. मात्र जिल्हा प्रशासन त्यात आणखी पाचची वाढ करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राऊत यांनी पुढे सांगितले की, ‘या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करत आहे. हे प्रकल्प सुरू होण्यास किमान सहा ते सात आठवड्यांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. दहा एअर जनरेटर सुरू झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण जिल्ह्याला होऊ शकतो.’