जामनेर : पंचायत समिती कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची अनलॉकनंतर वर्दळ वाढली आहे. मात्र, अजूनही कर्मचारी पुरेसे उपस्थित राहत नसल्याने कुचंबणा होत आहे. ग्रामीण भागातून कामाच्या चौकशीसाठी मंगळवारी आलेल्या नागरिकांनी सभापती जलाल तडवी व माजी उपसभापती सुरेश बोरसे यांची भेट घेऊन कैफियत मांडली.
तडवी व बोरसे यांनी याबाबत सहायक गटविकास अधिकारी के. बी. पाटील यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी बहुतेक जण रजेवर असल्याचे सांगितले. गेली दोन महिने लाॅकडाऊनमुळे कार्यालयात उपस्थिती कमी असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. आता १०० टक्के उपस्थितीचे आदेश असूनदेखील कर्मचारी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. प्रशासनाने याची दाखल घेतली पाहिजे, असे सभापतींनी सांगितले.
रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींबाबत जामनेरला मोठा घोळ झाला असून, सत्ताधारी व विरोधक यांच्या राजकीय दडपशाहीच्या भूमिकेमुळे नेमक्या किती विहिरींना मंजुरी मिळाली याची माहिती प्रशासनाकडून मिळू शकली नाही.
ग्रामसेवकाच्या बदलीवरून गेल्या आठवड्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये माजी उपसभापती व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत खडाजंगी झाली होती. पंचायत समितीतील या अनागोंदी कारभारास कंटाळून भाजपचे गटनेते अमर पाटील यांनी राजीनामा दिला होता.