लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : निधी आणि लॉकडाऊनच्या कारणामुळे रखडलेले मोहाडी शिवारातील महिला रुग्णालयाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. यात तीन इमारतींचे काम जवळपास झाले असून, एका इमारतीचे काम बाकी आहे. यासाठी किमान चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. बांधकामाची वाढीव मुदत ही फेब्रुवारी २०२१ मध्ये संपत आहे.
२०१८ पासून मोहाडी शिवारात शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. या बांधकामाची मुदत ही फेब्रुवारी २०२० पर्यंत होती. तेव्हा वर्षभराची वाढीव मुदत घेण्यात आली होती. यात मध्यंतरी निधीअभावी काम रखडले होते. गेल्यावर्षी मोठा निधी परतही गेला होता. संपूर्ण रुग्णालयासाठी ३२ ते ३५ कोटी निधी अपेक्षित आहे. यासह परिसरात निवासस्थाने बांधण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, मध्यंतरी लॉकडाऊनमुळे मजूरवर्ग नसल्याने काम रखडले होते. आता साधारण ८० टक्के काम झाले असून, आगामी चार महिन्यांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चार महिने काम बंद असल्याने शासनाकडून या चार महिन्यांची मुदतवाढ राहील, असेही सांगण्यात आले आहे.
दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह
प्रशस्त जागेत रुग्णालयाची उभारणी होत असून, रुग्णांसाठी मोकळी सुविधा आहे. यात सुटसुटीत आणि उच्चदर्जाची वैद्यकीय सेवा पुरविली जाणार असून, यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह बांधण्यात आले आहेत. यात रेलिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.