लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : उमाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांमधील गाळ क्रेनच्या साहाय्याने काढत असताना अचानक शॉक लागून मजुराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेपूर्वी घडली. प्रमोद रमेश धनगर (२५, रा. खंडाळा, ता. भुसावळ) असे मयत मजुराचे नाव असून, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद धनगर हा भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी होता. गेल्या एक ते दीड महिन्यापासून तो मनपाच्या उमाळा येथील जल शुद्धीकरण केंद्रात ठेकेदाराकडे मजूर म्हणून काम करित होता. शुक्रवारी सकाळी १० वाजेपासून शुद्धीकरण केंद्रात साफसफाईचे काम सुरू होते. त्याअंतर्गत प्रमोद हा केंद्रातील टाक्यांमधील गाळ क्रेनच्या सहाय्याने काढत होता. त्यावेळी इलेक्ट्रिक वायर कट होऊन तिचा क्रेनला स्पर्श झाला आणि प्रमोद याला विजेचा जोरदार धक्का लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जवळचं काही मजूर साफसफाईचे काम करीत होते. त्यांना ही घटना लक्षात येताच, त्यांनी लागलीच प्रमोदला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ हलविले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंति त्यास मृत घोषित केले.
कुटुंबीयांना मदत मिळावी...
प्रमोद धनगर याचा विजेचा जोरदार शॉक लागून मृत्यू झाल्याचे कळताच, नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. त्यामुळे त्याठिकाणी एकच गर्दी झाली होती. तर काहींनी धनगर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत नातेवाइकांसह मजुरांची गर्दी रुग्णालयात कायम होती. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास अतुल वंजारी, अतुल पाटील करीत आहेत. प्रमोद धनगर यांच्या पश्चात वडील रमेश, आई ध्रुपताबाई, पत्नी हर्षदा व भाऊ व बहिणी असा परिवार आहे.