जळगाव : एमआयडीसीतील एन सेक्टरमधी संजय नेहरु शिसोदीया (वय २३) या कामगाराला चाकूचा धाक दाखवून सात हजार रुपये लुटून नेणाऱ्या शाहरुख युसूफ पटेल (वय २४ रा.सुप्रीम कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी सुप्रीम कॉलनीतून अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षाही जप्त करण्यात आली आहे.
मुळ मध्यप्रदेशातील रहिवासी असलेला संजय शिसोदीया हा तरुण एमआयडीसीतील एन सेक्टर येथे कामाला असून त्याच ठिकाणी राहतो. कुटुंब मूळगावी वास्तव्यास आहेत. मुलगी आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता शिसोदीया कंपनीतून बाहेर पडला. बसस्थानकावर जाण्यासाठी रिक्षात (क्र.एम.एच.१९ सी.डब्लू १६७६) बसला. बाजार समितीजवळ रिक्षाचालकाने खिशातून चाकू काढून धमकी देत खिशातील ७ हजार रुपये बळजबरीने काढून घेऊन शिसोदीयाला तेथेच सोडून रिक्षाचालक पसार झाला होता. याबाबत शिसोदीया याने रविवारी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती.
रिक्षा क्रमांकावरुन संशयित निष्पन्न
एमआयडीसी पोलिसांनी रिक्षा क्रमांकावरुन संशयिताचे नाव निष्पन्न केले. तो सुप्रिम कॉलनीत असल्याची माहिती मिळाल्यावर सोमवारी सकाळी ७ वाजताच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, मुकेश पाटील, इमरान सैय्यद, चेतन सोनवणे, मुदस्सर काझी यांच्या पथकाने त्याला घरातूनच ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात रिक्षा जप्त करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व संदीप पाटील करीत आहेत.
कंत्राटदाराला लुटणाऱ्याला अटक
औरंगाबाद महामार्गाच्या कामाच्या ठेकेदाराला रस्त्यात अडवून मारहाण करत व लूट केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आकाश अशोक गायकवाड (वय २५,रा.रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सुधीर व्यंकट रविपती(वय ४०,रा.नेरी जामनेर, मुळ रा.नेल्लूर, आंध्र प्रदेश) यांना ३ एप्रिल रोजी रात्री चिंचोली ते उमाळा दरम्यान ट्रिपलसीट दुचाकीवर आलेल्यांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करुन त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, दोन अंगठ्या आणि रोकड असा १ लाख २५०० रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून घेतला होता. याप्रकरणी ४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात निवृत्ती ऊर्फ भगवान शांताराम बाविस्कर (वय३२) व राहुल रामदास कोळी (वय २२, रा. मेस्को माता नगर) यांना अटक झाली होती. तर आकाश हा फरार होता. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे व रतिलाल पवार करत आहेत.