जळगाव : कंपनीतून काम करून घरी परतल्यावर हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या भीमराव सुकलाल बारी (३३,रा.सम्राट कॉलनी) यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ ए.एस.३५६६) चोरट्यांनी लांबविल्याची घटना, १३ रोजी सायंकाळी साडेचार वाजता एमआयडीसीत महामार्गाला लागून असलेल्या एका हॉटेलच्या बाहेर घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास चेतन सोनवणे करीत आहे.
प्लॉट घेण्यासाठी पत्नीचा छळ; पतीसह नऊ जणांवर गुन्हा
जळगाव : नवीन प्लॅाट घेण्यासाठी माहेरहून २५ लाख रुपये आणावे, यासाठी हर्षाली नीलेश सूर्यवंशी (२७,रा.वाटिकाश्रक परिसर) या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह नऊ जणांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पैसे न आणल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.
पती नीलेश सूर्यवंशी, सासरे अशोक तुकाराम सूर्यवंशी, सासू शोभा सूर्यवंशी, जेठ चंद्रकांत सूर्यवंशी, जेठाणी देवयानी सूर्यवंशी, मोठे सासरे बळीराम तुकाराम सूर्यवंशी, जीवराम तुकाराम सूर्यवंशी (सर्व रा.भामलवाडी ता.रावेर), नणंद मनिषा राहुल पाटील, नंदोई राहुल अरुण पाटील (रा.नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास अंमलदार विलास पाटील करीत आहेत.
परिट समाजाच्या उपाध्यक्षाचा मृत्यू हृदयविकारानेच
जळगाव : शेजारच्यांशी झालेल्या भांडणात धक्काबुक्की होऊन, त्यात परीट धोबी समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल दौलत सोनवणे (५५) यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजता मेहरुणमधील दत्तनगरात घडली होती. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, व्हिसेरा राखीव ठेवण्यात आला आहे. सोनवणे यांच्यावर रविवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.