पहूर, ता.जामनेर : पेठमधील नवीन वसाहत असलेल्या खंडेराव नगरात पाण्याच्या टाकीवर काम करीत असताना खाली पडल्याने कामगाराचा जगीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ ते साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.अशोक मुरलीधर सपकाळे (४०) (रा.पिंप्राळा, जळगाव) असे मयत कामगाराचे नाव असून यात दोन जण जखमी झाले तर त्यातील एक गंभीर आहे. त्यास पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी एकतास उलटूनही रूग्णवाहिका न पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.प्राप्त माहितीनुसार पेठ गावांंतर्गत खंडेरावनगर ही नवीन वसाहत निर्माण झाली आहे. पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने या भागाला स्वतंत्र पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याच्या टाकीचे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी सोमवारी पाच कर्मचारी टाकीवर काम करीत होते. यादरम्यान पालक बांधत असताना त्याच्यातील नट निसटल्याने अशोक सपकाळे (मूळ रा.शिरपूर कान्हळदा, ता.भुसावळ, ह.मु.पिंप्राळा, जळगाव) हे खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.जखमी अर्धा तास अडकल लोखंडी सळईतवासुदेव दयाराम पाटील रा.भुसावळ हे लोखंडी सळईत अर्धा तास अडकल्याने गंभीर जखमी झाल. सळई कापून ग्रामस्थांच्या मदतीने पाण्याच्या टाकीवरुन पाटील यांना दोर बांधून खाली उतरविण्यात आले आहे. पाटील यांच्या मांडीत सळई घुसल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला. पहूर ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजूषा पाटील यांनी केले. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे. तर सुभाष सिताराम रा.भुसावळ हा किरकोळ जखमी झाला असून त्यालाही जळगाव ला हलविण्यात आले.घटनास्थळी सपोनि राकेशसिंह परदेशी, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे, अमोल देवडे, साहाय्यक फौजदार अनिल अहिरे, प्रविण देशमुख यांनी पाहणी केली आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्थानिक नेते व ग्रामस्थांनी मदत कार्य केले.
घटनास्थळावरून वासुदेव पाटील यांना रूग्णालयात दाखल करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला भ्रमणध्वनी करून एक तास उलटला तरीही रूग्णवाहिका आली नाही. त्यामुळे खासगी वाहनाने ग्रामीण रूग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केले. तरीदेखील रूग्णवाहिका पोहचली नव्हती. अखेर खासगी वाहनानेच जखमींना जळगाव येथे हलविण्यात आले. रविवारी घडलेल्या एका घटनेतही जखमीला रुग्णवाहिकेअभावी खासगी वाहनानेच जळगाव येथे हलविण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाची रूग्णवाहिका बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त आहे. याविषयी नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून रूग्णालयात रूग्णवाहिका न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पहूरकरांनी दिला आहे.