लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी मजुरी करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील गर्भवती महिलेला तत्काळ उपचार मिळाल्याने तिचा जीव वाचला आहे. डॉक्टरांनी तिला वेळेवर उपचार दिले.
मध्य प्रदेशातील बालवाशा गावचे रहिवासी असलेले हे कुटुंब महापालिकेच्या ठेकेदाराकडे काही दिवसांपासून काम करीत आहे. दोन दिवसांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांच्या समोर महापालिकेच्या ठेकेदाराच्या वतीने भुयारी गटारीचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी काम सुरू असताना परिवारातील कालुबाई काळू बालवाशा (वय २५) या विवाहित महिलेच्या पोटात त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबाने समोरच्या सरकारी रुग्णालयात आणले.
महिलेला दाखल करायचे म्हणून महिलेचा भाऊ जुम्मन, दीर व कुटुंबातील महिला सदस्य रुग्णालयात आले. त्या वेळी कक्ष सेवकांच्या मदतीने सोनोग्राफी केंद्र व इतर विभागांमध्ये महिलेला घेऊन पूर्ण तपासण्या करीत योग्य उपचार करण्यात आले. यासाठी परिचारिका सुषमा धनगर, ए. ए. कानडे यांनी सहकार्य केले. महिलेचे माहेर राजस्थान येथील असून सासर बलवशा, मध्य प्रदेश येथील आहे. महिलेला दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.