जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमध्ये उद्योग बंद असले तरी कामगारांना अडचणी येऊ नये यासाठी कामगार कल्याण मंडळाने पुढाकार घेत कामगार कल्याण निधीत खंड पडू न देता साडे चार हजारावर कामगारांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या. इतकेच नव्हे कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी जनजागृती करीत संरक्षण साहित्याचे वाटप केले.
कोरोनाचा संसर्ग उद्भवल्यानंतर झालेल्या लाॅकडाऊनमध्ये उद्योग बंद राहिल्याने कामगारही हातावर हात धरून बसले. यात असंघटीत कामगारांना तर स्थलांतरीत होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र संघटीत कामगारांसाठी काम करण्याऱ्या कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या लाभात खंड पडू नये यासाठी त्यांच्या कल्याणासाठी सातत्याने काम सुरू ठेवले.
अडचणींवर मात करीत अविरत काम
लॉकडाऊनमध्ये कोणी बाहेर पडत नव्हते. कार्यालयात उपस्थिती नाही, मात्र कामगारांचे कामही मार्गी लागावे, यासाठी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांनी ठरवून दिलेल्या मर्यादेत उपस्थित राहत कामगारांना अडचणी येऊ नये यासाठी आपले काम सुरूच ठेवले.
एका कामगाराकडून कामगार कल्याण निधीमध्ये एका वर्षाला जमा होणाऱ्या ९६ रुपयांची रक्कम (कामगार व कंपनी मालक मिळून) जमा होऊन त्यांना जवळपास १० हजार रुपयांपर्यंतच्या लाभाचा फायदा मिळतो. या निधी संकलनात खंड पडू न देता हे काम कल्याण मंडळाकडून सुरू राहिले. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास साडे चार हजारावर कामगारांना याचा लाभ मिळवून देण्यात आला.
या सोबतच कामगारांची आरोग्यविषय काळजी घेत त्यांना मास्कचे वाटप करण्यात येऊन कोरोनापासून बचावासाठी जनजागृती करण्याचे कामही कामगार कल्याण मंडळाने केले.
————
लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद असले तरी संघटीत कामगारांच्या लाभात खंड पडू नये यासाठी कामगार कल्याण निधी संकलनाचे काम करण्यासाठी व त्यांच्या आरोग्य विषयक उपाययोजनांसाठी प्रयत्न केले गेले. यात जनजागृती करण्यासह मास्कचे वाटपही करण्यात आले. लॉकडाऊनमध्ये अडचणी होत्या, मात्र ठरवून दिलेल्या मर्यादेत उपस्थिती ठेवत कामकाज सुरू ठेवले.
- भानुदास जोशी, कल्याण निरीक्षक, कामगार कल्याण मंडळ.