जळगाव : खान्देशात कवयित्री बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान महिला घडल्या. जिल्हा मार्केटिंग सोसायटीच्या चेअरमन शैलजादेवी दिलीपराव निकम यांचेही राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी, आदी क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य आहे, अशा नारीशक्तीचा सन्मान करणे, हे आपल्या भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.
राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे शैलजादेवी निकम यांना ‘नारीरत्न पुरस्कार २०२०-२१’चे वितरण महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दुपारी व. वा. वाचनालयाच्या अग्रवाल सभागृहात झाला. याप्रसंगी अरुणभाई गुजराथी बोलत होते. यावेळी सिंगल वुमन फाउंडेशनच्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ उपस्थित होत्या. प्रा. डॉ. शालिनी सोनवणे, डॉ. रवींद्र निकम, जगन पाटील, मीनाक्षी चव्हाण, जिल्हा मार्केटिंग सोसायटीचे संचालक रमेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कुटुंबाने शेतीशी निष्ठा राखून ग्रामविकासाला हातभार लावला. महिलांना सहकार क्षेत्रात मोठी संधी आहे. या पुरस्कार व सत्कारामुळे आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे मत सत्कारमूर्ती शैलजादेवी निकम यांनी व्यक्त केले.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सहकार सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त वाल्मिक पाटील, तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ निवासी त्वचारोगतज्ज्ञ डॉ. स्नेहल लोलगे यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संदीपा वाघ यांनी प्रास्ताविक, तर अय्याज मोहसीन यांनी सूत्रसंचालन केले.