जळगाव : महापालिकेच्या महासभेचे आयोजन गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात करण्यात आले असून महासभेत एकूण ४१ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. या महासभेत तब्बल २७० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या एकूण ४७० विषयांना मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. एकाच महासभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीतील कामांना मंजुरी देण्याची ही महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच महासभा ठरणार आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मनपाच्या महासभा या ऑनलाईन पद्धदतीने घेण्यात येत होत्या. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यामुळे गुरुवारी होणारी महासभा ही ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे या महासभेत अनेक विषयांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत घनकचरा प्रकल्पाच्या कामाच्या प्रस्तावाला भाजपचा विरोध असतानाही, या प्रस्तावाला भाजप नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे सांगत हा विषय मंजूर करून घेण्यात आला होता. त्या महासभेतील विषयाचे पडसाद आता, गुरुवारी होणाऱ्या महासभेत उमटण्याची शक्यता असून, याबाबत भाजपने सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाला धारेवर धरण्याची रणनीती आखल्याचे दिसून येत आहे.
महासभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आलेले प्रमुख विषय
१. शिवाजीनगर उड्डाणपुलावर मनपाकडून पथदिवे उभारण्याबाबतचा प्रस्ताव.
२. महापालिका हद्दीत लावण्यात येणाऱ्या जाहिराती, फलक व बॅनरच्या आकारणीबाबत धोरण निश्चित करणे.
३. नगरसेवकांकडून आलेल्या २५५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव.
४. शहरातील विविध भागात २ कोटींच्या निधीत हायमास्ट लावण्याबाबतचा प्रस्ताव.
५.शासकीय आयुर्वेद विद्यालयासाठी मनपाच्या बंद शाळा, रुग्णालये वापरण्यासाठी देण्याबाबत मनपाचे अंदाजपत्रकही होणार सादर
महापालिकेच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठीचे अंदाजपत्रक गुरुवारी सादर होणार असून यासाठी मनपाच्या विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी हे अंदाजपत्रक सादर करणार आहेत. यंदाच्या अंदाजपत्रकात मालमत्ताकरात कोणतीही वाढ केली जाणार नसून, नागरिकांना काही अंशी दिलासा देणारे हे अंदाजपत्रक राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्थायी समिती गठित न झाल्याने मनपाचे अंदाजपत्रक पहिल्यांदाच महासभेत सादर केले जाणार आहे.