किरण चौधरीरावेर, जि. जळगाव : जगातील आठवे आश्चर्य वाटावा अशा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनच्या निसर्गदत्त देणगीतील प्रस्तावित तापी नदीवरील अभिनव मेगारिचार्ज प्रकल्पासाठी जनमताचा खरा ‘रिचार्ज’ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना लाभला. या मेगारिचार्ज प्रकल्पाचे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात या सरकारची पाच वर्षे गेली. मात्र तरीही सविस्तर प्रकल्प अहवालास वस्तूत: कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरी मिळाली नाही. आता आगामी पाच वर्षांत डीपीआरची मंजुरी व प्रत्यक्ष अंमलबजावणीची मुहूर्तमेढ लाभण्यासाठी उदंड राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याची अपेक्षा जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ या चार मोठ्या धरणांसह गंगापुरी, मात्राण व चिंचाटी अशा तीन लघुसिंचन प्रकल्पाचे अशा एकूण सात धरणांमुळे केळीच्या हिरवळीमुळे ‘कॅलिफोर्निया’ वाटणाऱ्या या रावेर तालुक्यात यंदा दुष्काळाचीभीषण दाहकता जाणवू लागली. पाण्याअभावी २२ हजार हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उष्णतेत जळून खाक झाल्या आहेत. उरल्या सुरल्या बागाही जेमतेम १०-१०/२०-२० मिनिटांच्या १० ते १२ विहिरीवरील पाण्याचे उपसे रात्रंदिवस एका विहिरीत एकत्रित करून व्हेंटीलेटरवर तग धरून आहेत.सूर्यकन्या तापी नदीतील महापुराचे पाणी समुद्रात वाहून वाया जाते. यामुळे तापीच्या महापुराच्या पाण्याचा महाकाय कालवा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भूभ्रंशातून काढून व सातपुड्यातून निघणाºया नद्या-नाल्यांना जलपुनर्भरण करण्याची ही जलतज्ज्ञ व्ही.डी.पाटील यांची महत्वाकांक्षी संकल्पना आहे.तापी नदीवर खारीयाघुटी येथे वळवणीचा बंधारा घालून सातपुड्याच्या पायथ्याशी नेपानगर, बºहाणपूर, रावेर, यावल, चोपडा, ते अनेर धरणापर्यंत २३२ कि.मी. लांबीचा तर खारीयाघुटी ते धारणी, इच्छापूर डोलारखेडा असा ११० कि.मी.चा डावा कालवा काढून तेथून इस्लामपूर ते पुढे अनंतपूर तलावात शाफ्ट इंजेक्शन वेलद्वारे उपसा करून थेट अनंतपूरपर्यंत पुन्हा कालव्यातून जलपुनर्भरण करण्याचे दोन टप्पे प्रस्तावित आहेत. त्याची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सिंचनाची फलश्रुती पाहता सातपुडा ते तापी व पूर्णा दरम्यानचे दोन लाख १३ हजार ७०६ हेक्टर क्षेत्र तर मध्य प्रदेशातील ९६ हजार ८२ हेक्टर क्षेत्र केवळ सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गदत्त देणगीमुळे सिंचनाखाली येणार आहे.या महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाला तत्कालीन केंद्रीय जलसंपदामंत्री उमा भारती यांनी सुकी नदीपात्रातील लोहारा येथील बझाडा झोनमधील अद्भुत विहिरींचा जलसाक्षात्कार पाहून या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यांनी त्यावेळी सहा महिन्यात सर्वेक्षण करून योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.या महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाचे भूगर्भशास्त्रावर आधारित सर्वेक्षण, भौतिक सर्वेक्षण व लिडार सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण करण्यासाठी २५ हजार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. वॅपकॉस या उर्जा व जलसंवर्धन प्रणालीद्वारे सर्व्हेक्षण मोहीम फत्ते झाली आहे. मात्र आजपावेतो या महाकाय जलपुनर्भरण योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवालाचे अद्यापही भिजत घोंगडे कायम आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मेगारिचार्ज प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आल्याचे व केंद्रात भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या महाकाय जलपुनर्भरण योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आजपावेतो या अहवालाला प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी गत पाच वर्षे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण करण्यासाठी गमावली आहेत. असे असले तरी आता सुदैवाने या प्रकल्पाला हिरवी झेंडी देणारे केंद्र सरकार पुन्हा सत्तारूढ झाल्याने मेगारिचार्ज प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने मंजूर करून, जगात अभिनव ठरणाºया या मेगारिचार्ज प्रकल्पाला शाश्वत साकारण्यासाठी मुहूर्तमेढ रोवण्याची गरज आहे. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या रिचार्जची गरज असल्याची जनसामान्यांमधून तळमळीची भावना आहे.
जगातील अभिनव ‘मेगारिचार्ज’ प्रकल्पाला आता राजकीय इच्छाशक्तीच्या ‘रिचार्ज’ची खरी गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 3:08 PM
जगातील आठवे आश्चर्य वाटावा अशा सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बझाडा झोनच्या निसर्गदत्त देणगीतील प्रस्तावित तापी नदीवरील अभिनव मेगारिचार्ज प्रकल्पासाठी जनमताचा खरा ‘रिचार्ज’ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसे यांना लाभला. या मेगारिचार्ज प्रकल्पाचे सर्वेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात या सरकारची पाच वर्षे गेली. आता आगामी पाच वर्षांत डीपीआरची मंजुरी व प्रत्यक्ष अंमलबजावणीची मुहूर्तमेढ लाभण्यासाठी उदंड राजकीय इच्छाशक्तीची गरज असल्याची आहे.
ठळक मुद्दे महाकाय जलपुनर्भरण प्रकल्पाचे सर्व्हेक्षण व सविस्तर प्रकल्प अहवाल पूर्ण करण्यासाठी लागली एक पंचवार्षिकप्रशासकीय मंजुरी व अंमलबजावणीसाठी कधी लाभणार मुहूर्त?