जळगाव : कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढत असताना प्रशासकीय उपाययोजना, बेड मॅनेजमेंट सद्यस्थिती पूर्णत: कोलमडल्याचे गंभीर चित्र गेल्या आठवडाभरात समोर आले आहे. एका माजी सैनिकाला चार रुग्णालये फिरूनही बेड उपलब्ध न झाल्याचा गंभीर प्रकारही यात समोर आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर सीटू कक्षात बाहेर खुर्चीवर रुग्णांना ऑक्सिजन लावून त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या १५ दिवसात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. यात शासकीय यंत्रणेतील सर्व बेड जवळपास फुल्ल झालेले आहेत. अशा स्थितीत गंभीर रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे गंभीर चित्र पुन्हा एकदा जिल्ह्यात उभे राहिले आहे. यात जळगाव शहरात अत्यंत बिकट परिस्थिती आहे.
रुग्ण परत पाठविले जातात
सीटू या कोरोना कक्षात अत्यंत बिकट परिस्थिती उद्भवली आहे. बुधवारी या कक्षांमध्ये एका वृद्ध रुग्णाला खुर्चीवर बसवून त्याला व्हेंटिलेटर्स लावण्यात आले होते. सर्व कक्ष पूर्णत: फुल्ल भरला असून दररोज किमान वीस ते पंचवीस रुग्ण या ठिकाणाहून परत पाठविले जात आहेत. अतिदक्षता विभाग, सी १, सी ३ हे सर्व कक्ष फुल्ल असल्याने अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
वादात तीन कक्ष बंद
मनुष्यबळ नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनासाठीचे तीन कक्ष अद्यापही बंदच आहे. जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले डॉक्टर व कर्मचारी नियुक्तच होत नसल्याने हे कक्ष उघडणे कठीण जात आहे. प्रशासनाने याबाबती गांभीर्याने विचार करावा, अन्यथा जागेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत जाईल, असे सांगितले जात आहे. यात जिल्हा शल्यचिकित्सक व जीएमसी प्रशासन यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे कक्ष विस्तारीकरणाचा मुद्दा लांबल्याचे बोलले जात आहे.
रोज रुग्णांची भर
नियमित ९५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहे. ७०० पर्यंत रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. यात साधारण २०० रुग्णांना नियमित रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही रुग्णांना १५ दिवसांपेक्षाही अधिक कालावधीसाठी ठेवावे लागत असल्याने बेड लवकर खाली होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बेड मॅनेजमेंट पूर्णत: कोलमडले आहे.
अशी आहे स्थिती
जीएमसी डीसीएच : १३७ बेड, रिक्त ००
इकरा डीसीएचसी : ७६, रिक्त ००
सीसीसी : ९७० बेड, रिक्त १२०