जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील दूरदर्शन टॉवरजवळील स्वामिनारायण मंदिरात शनिवारी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घागरभरण आणि तर्पण विधी करण्यात आला. याप्रसंगी दहा पुरोहितांनी वेदमंत्रोचार केला. शास्त्रोक्त पद्धतीने पितरांच्या मोक्षासाठी अक्षय्य तृतीयेला तब्बल ८२१ घागरींचे एकाच ठिकाणी पूजन झाले.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या दिवशी भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे. अशा पवित्र दिवशी आपल्या पितरांना, वाडवडिलांना उद्देशून तर्पण कर्म सर्वत्र करण्याची परंपरा खान्देशातील घराघरांत चालत आलेली आहे. घरात मातीची घागर आणून त्यावर डांगर, आंबा, नारळ, फुले ठेवून त्याची पूजा केली जाते. आगारी करून गोड-धोड, वडे, भजे, आमरस, पुरणपोळीचा घास भरविण्याची प्राचीन प्रथा आहे.
यानिमित्त जळगाव येथील स्वामिनारायण मंदिरात घागरभरण व पितृ तर्पण कार्यक्रम वेदोक्त मंत्रोच्चारात ब्राह्मणांच्या मार्फत संपन्न झाला. यात जळगाव येथील ८२१ हरिभक्तांनी नावनोंदणी करून घागरी आणून सर्व विधी संपन्न झाला. यात गुरुवर्य गोविंदप्रसाददासजी स्वामी यांचे आशीर्वाद, शास्त्री पुरुषोत्तम प्रकाशदासजी यांचे मार्गदर्शन, शास्त्री नयनप्रकाशजी यांनी संयोजन केले.