जळगाव : जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या रथोत्सवानंतर लगेचच कुस्ती स्पर्धा घेतली जाते. संस्थानचे स्व. अप्पा महाराज यांनी रथोत्सवाबरोबरच ही कुस्ती स्पर्धा सुरू केली होती. काही काळ ही स्पर्धा शिवतीर्थ मैदानावर होत होती. मात्र नंतरच्या काळात ही स्पर्धा बंद पडली होती. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांत केशव स्मृती प्रतिष्ठान आणि श्रीराम मंदिर रथोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा थाटात पार पडली. गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर २०१९ला ही स्पर्धा पार पडली. त्यात जवळपास पाच ते साडेपाच लाख रुपयांची बक्षिसे दिली जातात. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ही कुस्ती स्पर्धा सागर पार्कवर घेतली जाते. २०१९ मध्ये या स्पर्धेत कोल्हापूरचा ‘भारत केसरी’ भरत मदने हा विजेता ठरला होता.
जळगावचा युवा आणि उत्तम पहिलवान म्हणून ओळखला गेलेला नितीन गवळी हादेखील गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत खेळत होता.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम मंदिर रथोत्सवदेखील साधेपणाने करण्यात आला. रथ फक्त पाच पावले पुढे नेण्यात आला होता. त्यामुळे रथासोबतच होणारे इतर कार्यक्रमदेखील रद्दच झाले आहेत.
इतर क्रीडा स्पर्धा
जळगाव शहरात दरवर्षी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा कोरोनामुळे कोणत्याही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन आतापर्यंत करण्यात आलेले नाही. विंटर सॉफ्टबॉल लीग जिल्हा क्रीडा संकुलात घेतली जाते. मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यापासून सॉफ्टबॉलचे खेळाडू मैदानात उतरू शकलेले नाहीत.