भुसावळ : शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार इयत्ता बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तक नव्यानेच लागू करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तकातील घटकांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेखक-कवींशी झूम अॅपद्वारे आॅनलाईन संवाद साधण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत तीन लेखक-कवींशी संवाद साधण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ तथा बालभारतीचे मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांच्या संकल्पनेतून दहावी मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकातील तब्बल बारा लेखक-कवींशी आॅनलाईन संवाद साधण्याचा उपक्रम नुकताच पार पडला.या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पहिल्यांदाच एकाच पाठ्यपुस्तकातील १२ लेखक-कवींनी एकाच व्यासपीठावर येऊन शिक्षकांशी संवाद साधला. याच धर्तीवर इयत्ता बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवींशी संवाद साधण्यात येणार आहे. उपक्रमाची संकल्पना डॉ.जगदीश पाटील यांची असून समन्वयक म्हणून जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातील प्रा.गणेश सूर्यवंशी राहतील.उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुनील डिसले बारामती यांचे सहकार्य, तर इझी टेस्टचे प्रा.मुरलीधर भुतडा पुणे यांचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे. नवीन पाठ्यपुस्तक शिकविताना शिक्षकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे. त्यासाठी या उपक्रमाचा कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी भाषा शिक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.तीन दिवसात तीन संवादसोमवार, दि.२९ जूनला दुपारी तीनला ‘आरशातली स्त्री’ या कवितेवर कवयित्री हिरा बनसोडे आॅनलाईन संवाद साधणार आहेत. ३० जून रोजी लेखिका डॉ.प्रतिमा इंगोले आपल्या ‘गढी’ या कथेसंदर्भात संवाद साधतील. १ जुलै रोजी कवयित्री कल्पना दुधाळ आपल्या ‘रोज मातीत’ या कवितेसंदर्भात आॅनलाईन संवाद साधणार आहेत.
बारावी मराठी युवकभारती पाठ्यपुस्तकातील लेखक-कवी साधणार आॅनलाईन संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 3:33 PM