‘वाचनाने माणसाची वैचारिक पातळीची बैठक प्रगल्भ होते’ हे वाक्य माझे गुरुजी गाजरे यांचे आजही मनास प्रेरणा देते आणि या एका वाक्याने मी अगदी चौथ्या वर्गापासून खूप पुस्तके वाचून काढली आणि मी ज्यांना पुस्तकातून वाचले त्या कवी-लेखकांना आपण भेटू शकू का? त्यांच्याशी आपणास बोलता येईल काय? या वाचनातूच माझ्यातला लेखक, कवी जागा झाला.आई-वडील शेतकरी असल्यामुळे शेतात सुट्टीच्या दिवशी जायचो. तिथल्या निसर्गाशी एकरुप होऊन कविता लिहायचो. वृत्तपत्रामध्ये माझ्या कविता येऊ लागल्या. त्यामुळे गावकऱ्यांत, मित्रांमध्ये कवी म्हणून मी वावरू लागलो आणि ‘शब्दशिवार’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ‘पाऊसखुणा’ हा कविता संग्रह. त्यानंतर ‘मेळावा’ कथासंग्रह आणि आता ‘पंचायत’ ही कांदबरी.या साऱ्या लेखन प्रवासात प्रथम माझे आई-वडील, शिक्षक, निसर्ग आणि मित्रगण तसेच मला माझ्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना देणारे स्व.भगवान ठग तसेच प्राचार्य डॉ.किसन पाटील व डॉ.प्रतिमा इंगोले यांनी माझी लेखन प्रेरणेला खूप मोठे बळ दिले आणि आज याच लेखनामुळे महाराष्ट्रातील प्रतिभावंत साहित्यिक, कवी, कथाकार यांच्याशी बोलण्याची आणि यांची सोबत मिळण्याची क्षमता माझ्यात निर्माण झाली हे मी माझे भाग्य समजतो.-प्रमोद पिवटे, मुक्ताईनगर, जि.जळगाव
‘वाचनातून लिहिता झालो.....’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 3:19 PM