लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत शहरातील विविध भागांत होत असलेल्या कामांच्या निविदा चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याने १ कोटी ६० लाख रुपयांच्या कामाच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ठराविक ठेकेदारांना फायदा करण्यासाठी या निविदा प्रक्रिया बांधकाम विभाग व मनपा प्रशासनाच्या नियमांचा वापर करून, चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आल्याचा आरोप या सभेत सर्वच सदस्यांनी केला होता, त्यामुळे या कामांच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोमवारी मनपा स्थायी समितीच्या ऑनलाइन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, नगर सचिव सुनील गोराणे आदींची उपस्थिती होती. सभेपुढे १३ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी ९ विषयांना स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. ४ विषय नामंजूर करण्यात आले आहेत. मनपा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या चुकीच्या निविदांवरून नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यासह डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना मनपाकडून होत नसलेल्या उपाययोजनांवरूनदेखील नगरसेवकांनी मनपा अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
मनपाकडून वारंवार चुका
१. मनपा प्रशासनाकडून काढण्यात येणाऱ्या प्रत्येक निविदा प्रक्रियेत चुकांचा पाढा नियमितपणे सुरूच आहे. निविदा काढताना केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या किंवा मनपा प्रशासनाच्या अटी व शर्थी लावण्यात आल्या पाहिजेत, मात्र, एकाच निविदेत बांधकाम विभाग व मनपा प्रशासनाच्याही अटी-शर्थींचा वापर केला जातो.
२. अशा कारणांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेला ठेकेदारही कमी बोली लावून निविदा घेतो. मात्र, कमी बोली लावून निविदा घेतलेला ठेकेदार कामे ही त्याच सुमार दर्ज्याचे करतो, असा आरोप माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केला. त्यामुळे या निविदा रद्द करण्यात याव्यात असे लढ्ढा यांनी सांगितले. त्यावर सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी आक्षेप घेऊन, यामुळे मनपाचे नुकसान होईल, असे सांगितले. मात्र, खराब कामे होऊनही नागरिकांचे नुकसान होणार असल्याचे कारण देत सत्ताधाऱ्यांनी हा विषय रद्द करण्याचा निर्णय घेतला.
शहरात डेंग्यू सदृश, मनपा अधिकारी मात्र अदृश
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना मनपा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे. मनपाकडे वेळोवेळी तक्रार करूनदेखील मनपा प्रशासन डेंग्यूबाबत गंभीर नसल्याचेही दारकुंडे यांनी सांगितले. शहरात रुग्ण वाढल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे वेतन कपात करण्याची मागणी दारकुंडे यांनी केली आहे, तसेच शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असतानाही मनपा अधिकारी शहरात डेंग्यूसदृश रुग्ण असल्याचे कारण देत आहेत. ‘शहरात डेंग्यू सदृश, मात्र मनपा अधिकारी अदृश; असल्याचे नितीन लढ्ढा यांनी सांगितले. सभेत मनपा स्थायी समितीमधील ८ सदस्य निवृत्त करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. दैनिक बाजार शुल्काच्या अहवालास मंजुरी देण्यात आली.